बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडलेली सळई तरुणाच्या शरीरातून आरपार; शस्त्रक्रियानंतर प्रकृती स्थिर
By पंकज पाटील | Updated: April 1, 2023 23:23 IST2023-04-01T23:22:20+5:302023-04-01T23:23:18+5:30
आठव्या मजल्यावरून एक सळई अचानक खाली कोसळली. ही सळई सत्यप्रकाश याच्या खांद्यात घुसली आणि पाठीतून आरपार बाहेर पडली.

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडलेली सळई तरुणाच्या शरीरातून आरपार; शस्त्रक्रियानंतर प्रकृती स्थिर
बदलापूर: बदलापुरात एका निर्माणाधीन इमारतीवरून पडलेली सळई खाली उभ्या असलेल्या तरुणाच्या शरीरात घुसून आरपार निघाल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे. या तरुणावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
बदलापूर पूर्वेच्या पनवेलकर हायवे लगत नव्या गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. आज संध्याकाळी साडेचारच्या सुमारास तळमजल्यावरील दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग करण्यासाठी सत्यप्रकाश तिवारी हा २६ वर्षीय कामगार काम करत होता. या इमारतीचे बांधकाम सुरू असल्यामुळे आठव्या मजल्यावरून एक सळई अचानक खाली कोसळली. ही सळई सत्यप्रकाश याच्या खांद्यात घुसली आणि पाठीतून आरपार बाहेर पडली. यानंतर सत्यप्रकाश याला तातडीने उपचारांसाठी खाजगी रुग्णाल दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करत त्याच्या पाठीत घुसलेली सळई काढली. शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.