बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील अल्पवयीन मुलाचा मृत्यू, एक गंभीर
By जितेंद्र कालेकर | Updated: July 4, 2024 22:12 IST2024-07-04T22:12:44+5:302024-07-04T22:12:55+5:30
याप्रकरणी अल्पवयीन ऋषी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली.

बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील अल्पवयीन मुलाचा मृत्यू, एक गंभीर
ठाणे: चुकीच्या दिशेने जात एका खासगी बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीवरील ऋषी किशोर मंडल (१७, रा. लुईसवाडी, ठाणे) या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट भागात घडली. या अपघातात त्याचा साथीदार हरीश लोखंडे (१८) हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ऋषी आणि हरीश हे दोघेही एकाच दुचाकीवरुन वागळे इस्टेट रोड क्रमांक १६ कॅपरिहन्स कंपनीसमोरुन आशर आयटीकडून पेट्रोल पंपाच्या दिशेने जात होते. त्यावेळी एका खासगी बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेला ऋषीच्या मोटारसायकलची समोरुन येणाऱ्या ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) बसला धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋषीचा मृत्यू झाला असून हरिश लोखंडे हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी अल्पवयीन ऋषी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली.