शस्त्राचा धाक दाखवून दुकान लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास अटक
By धीरज परब | Updated: June 3, 2023 19:30 IST2023-06-03T19:30:07+5:302023-06-03T19:30:22+5:30
दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती.

शस्त्राचा धाक दाखवून दुकान लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास अटक
मीरारोड - मीरारोड मध्ये एका सराफास शस्त्र दाखवून लुटण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी एका आरोपीला अटक करून दोन गावठी कट्टे, १ काडतूस आणि दुचाकी जप्त केली आहे. त्याचा साथीदार मात्र अजून सापडलेला नाही. २७ मे रोजी मीरारोडच्या विजय पार्क भागात कोठारी ज्वेलर्स मध्ये घुसून दोघा लुटारूंनी अग्निशस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मोहित कोठारी यांनी दोघांचा प्रतिकार केल्याने ते कोठारी यांचा मोबाईल लुटून पळून गेले होते. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती.
मीरारोड व नवघर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश काळे व हनिफ शेख, उपनिरीक्षक किरण वंजारी व पथकाने तपास करत गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली तसेच एका आरोपीचे नाव निष्पन्न केले. गुन्हे शाखा १ चे पोलीस निरीक्षक अविराज कुऱ्हाडे, सहायक निरीक्षक पुष्पराज सुर्वे व पथकाने आरोपीचा शोध घेऊन आकाश मनोज गुप्ता (२५ ) रा. जनशक्ती सोसायटी, बायशेतपाडा, संतोष भवन, नालासोपारा पूर्व ह्याला काशीमीरा भागातून अटक केली. तर त्याचा साथीदार मात्र पोलिसांच्या हाती लागला नसून त्याचा शोध सुरु आहे.