उपचाराअभावी गेला जीव, मुरबाडच्या तुळई केंद्रातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 14:10 IST2024-03-08T14:10:18+5:302024-03-08T14:10:35+5:30
तालुक्यात म्हसा, नारिवली, तुळई, धसई, शिरोशी, मोरोशी, सरळगाव, शिवळे, किशोर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, तेथे औषधसाठा, साहित्य उपलब्ध आहे. परंतु केंद्रात डॉक्टर किंवा कर्मचारी असतील याची शक्यता नसल्याने येणाऱ्या रुग्णांवर उपचार होईलच याची खात्री नसते.

उपचाराअभावी गेला जीव, मुरबाडच्या तुळई केंद्रातील प्रकार
मुरबाड : तालुक्यातील आरोग्य यंत्रणेवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आपल्या मर्जीप्रमाणे कामावर येत आहेत. परिणामी रुग्णांना वेळीत उपचार मिळत नाहीत. अशाच एका घटनेत तुळई येथील वसंत जाधव या शिक्षकाला जीव गमवावा लागला.
तालुक्यात म्हसा, नारिवली, तुळई, धसई, शिरोशी, मोरोशी, सरळगाव, शिवळे, किशोर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, तेथे औषधसाठा, साहित्य उपलब्ध आहे. परंतु केंद्रात डॉक्टर किंवा कर्मचारी असतील याची शक्यता नसल्याने येणाऱ्या रुग्णांवर उपचार होईलच याची खात्री नसते.
तुळई गावातील वसंत जाधव यांच्या छातीत दुखत असल्याने ते मंगळवारी सकाळी १० वाजता गावातील तुळई आरोग्य केंद्रात गेले. तेथे दोन डाॅक्टर कार्यरत असताना डॉ. प्रियंका गोरडे या सकाळीच निघून गेल्या, तर डॉ. तेजश्री घोटकर या ११ वाजता आल्या. जाधव यांच्यावर तेथील परिचारिकेने थातूरमातूर उपचार करून त्यांना घरी पाठवले.
- घरी जाताच जाधव यांची प्रकृती खालावल्याने नातेवाइकांनी त्यांना तातडीने मुरबाडला नेले. मात्र, रस्त्यातच त्यांचा जीव गेला. जर आरोग्य केंद्रात डॉक्टर हजर असते तर या रुग्णाचा जीव गेला नसता.
- अशा अनेक घटना घडत असताना आरोग्य यंत्रणा मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने जबाबदार अधिकारी व डॉक्टर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना उपतालुकाप्रमुख बाळा चौधरी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली आहे.
या प्रकरणी चौकशीसाठी आमचे पथक माहिती घेत आहे. त्यांचा अहवाल प्राप्त होताच दोषींवर कारवाई करण्यात येईल.
- गंगाधर परगे,
जिल्हा आरोग्य अधिकारी