हेल्मेट म्हणजे फक्त कवच नाही… ते एखाद्या कुटुंबाचे जगणे : जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ
By सुरेश लोखंडे | Updated: November 20, 2025 20:59 IST2025-11-20T20:59:08+5:302025-11-20T20:59:51+5:30
हेल्मेट घाला, कारण कुणीतरी तुमच्यावर जीवापाड प्रेम करतं.

हेल्मेट म्हणजे फक्त कवच नाही… ते एखाद्या कुटुंबाचे जगणे : जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ
- सुरेश लोखंडे
ठाणे : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज एक वेगळाच, हृदयाला भिडणारा उपक्रम संध्याकाळी उशिरापर्यंत पार पडला. रस्ते अपघातांमध्ये अकाली विझणार्या तरुणांच्या जीवनदीपाबद्दल बोलताना ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचा आवाजही दुःखाने भरला.“प्रत्येक अपघातात फक्त एक जीव जात नाही… तर, एक घर उद्ध्वस्त होतं, आई-वडिलांचं विश्व कोसळतं. म्हणूनच हेल्मेटचा वापर ही जबाबदारी नसून प्रेमाची शपथ आहे,'असे त्यांनी भावूक शब्दांत त्यांनी उपस्थितांना हेल्मेटचे महत्त्व आज संध्याकाळी पटवून दिले.
येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात 'रस्ता सुरक्षा ' हेल्मेटचे महत्त्व पटवून देणारा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांच्या खास उपस्थिती त पार पडला. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ‘हेल्मेट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून देशभरात ओळखले जाणारे राघवेंद्र कुमार यांच्या उपस्थितीत लहान विद्यार्थ्यांना हेल्मेट वाटप करण्यात आले आणि संपूर्ण सभागृहात एकच संदेश घुमला 'एक हेल्मेट, एक जीव वाचवतो.' लहान मुलांच्या डोक्यावर हेल्मेट चढताच सभागृहात एक वेगळीच ऊब निर्माण झाली. इतक्या लहान वयात त्यांना सुरक्षिततेची सवय लावण्याची कल्पना राघवेंद्र कुमार यांनी मांडली आणि उपस्थित पालकांच्या डोळ्यांतही आपुलकीची जाणीव दाटून आली.
'आजची ही पिढी जागरूक झाली, तर उद्या कुठलीही आई आपल्या मुलासाठी रडणार नाही,' असे कुमार म्हणाले. या कार्यक्रमात झालेला शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्यावरील एकपात्री प्रयोग विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेमाची नवचेतना रुजवून गेला. शेवटी मान्यवरांचा सन्मान आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेती शौर्या अंबुरेचा गौरव होताच वातावरण अभिमानाने भारून गेलं. आज ठाण्यातून दिलेला हा छोटासा संदेश कदाचित उद्याच्या अनेक कुटुंबांचे भविष्य वाचवेल — हेल्मेट घाला, कारण कुणीतरी तुमच्यावर जीवापाड प्रेम करतं. .....