भिवंडीजवळील कळवा खाडीत आढळला पुरुषाचा मृतदेह
By जितेंद्र कालेकर | Updated: December 2, 2023 19:28 IST2023-12-02T19:28:14+5:302023-12-02T19:28:33+5:30
घातपात की आत्महत्या असा प्रश्न निर्माण झाला असून मृतदेह नारपोली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

भिवंडीजवळील कळवा खाडीत आढळला पुरुषाचा मृतदेह
ठाणे: ठाण्यातील कळवा भिवंडीच्या दरम्यान असलेल्या खाडीमघ्ये एका ६० ते ६२ वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने शनिवारी दिली. त्याचा अपघात झाला की आत्महत्या की अन्य काही घातपाताचा प्रकार आहे, याचा तपास करण्यात येत असल्याचे नारपोली पोलिसांनी सांगितले.
कळव्यातील खारेगाव टोलनाक्याजवळ मुंबई नाशिक नवीन उड्डाणपुलाचे काम चालू असलेल्या ब्रीजखाली रेतीबंदर खाडीमध्ये एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह रविवारी २ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आढळल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे मिळाली. त्याच आधारे घटनास्थळी कळवा, नारपोली पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.
या पथकांनी हा मृतदेह रेतीबंदर खाडीमधून बाहेर काढून नारपोली पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी हा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी भिवंडीच्या इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.