चेंबरमध्ये अडकलेल्या ट्रकला बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवली, क्रेनचेही चाक चेंबरमध्येच अडकले
By नितीन पंडित | Updated: January 15, 2023 20:22 IST2023-01-15T20:22:17+5:302023-01-15T20:22:25+5:30
शहराच्या मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

चेंबरमध्ये अडकलेल्या ट्रकला बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवली, क्रेनचेही चाक चेंबरमध्येच अडकले
भिवंडी - भिवंडीत रस्ता चुकलेला ट्रक माघारी जात असताना गटारीच्या चेंबर मध्ये रविवारी अडकला होता, दुर्दैव म्हणजे हा ट्रक बाहेर काढण्यासाठी मागविलेल्या क्रेनचा चाक सुध्दा गटारीत रुतल्याने स्थानिक पोलिसांना ट्रेक व क्रेन बाहेर काढण्यासाठी मोठा आटापिटा करावा लागला.
कल्याण रोड येथून कापडाचे गठाण घेऊन सुरत येथे निघालेला भलामोठा ट्रक वाडा रोड मार्गे जात असताना वाट चुकल्याने तो शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहचला.आपला मार्ग भरकटल्याचे लक्षात आल्यावर वंजारपट्टी नाका कडे वळवून घेण्यासाठी ट्रक चालकाने तो रिव्हर्स घेतला, परंतु रस्त्या लगतच्या गटारी वरील चेंबरचा अंदाज न आल्याने ट्रकचा मागील चाक चेंबर मध्ये अडकला.
त्यामुळे अडकून पडलेल्या ट्रक ला बाहेर काढण्यासाठी क्रेन मागविण्यात आली.परंतु दुर्दैव म्हणजे या क्रेन चालकाचा सुध्दा अंदाज चुकल्याने त्याचा ही एक चाक चेंबर मध्ये अडकला .त्यामुळे आता बाहेर काढायचे कोणाला कशाच्या मदतीने हा प्रश्न स्थानिक निजामपुरा पोलिसांसमोर पडला होता.त्यानंतर एक दुसरा ट्रक मागवून त्यामध्ये ट्रक मधील कापडाचे गठाण भरून ट्रक रिकामा करून त्यानंतर ट्रक बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.मात्र तोपर्यंत शहराच्या मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.