नाशिक-मुंबई मार्गावर कंटेनरची दुभाजकाला धडक, सुदैवाने चालक बचावला
By जितेंद्र कालेकर | Updated: October 1, 2024 17:31 IST2024-10-01T17:31:42+5:302024-10-01T17:31:57+5:30
कंटेनर चालक इस्लामउद्दीन हा मुंबईकडे कंटेनर घेऊन मंगळवारी सकाळी निघाला होता.

नाशिक-मुंबई मार्गावर कंटेनरची दुभाजकाला धडक, सुदैवाने चालक बचावला
ठाणे: नाशिककडून मुंबईला निघालेल्या कंटेनर चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला आणि तो कंटेनर थेट दुभाजकाला धडकल्याची घटना मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. हा अपघात ठाण्यातील माजिवाडा नाका येथे झाला. सुदैवाने, यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. या अपघातामुळे वाहतुक कोंडी झाली नव्हती. परंतू, तब्बल तासभर धीम्या गतीने वाहतूक सुरू होती. कंटेनर रस्त्याच्या एका बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
कंटेनर चालक इस्लामउद्दीन हा मुंबईकडे कंटेनर घेऊन मंगळवारी सकाळी निघाला होता. ठाण्यात आल्यावर त्याचा कंटेनरवरील ताबा सुटला. त्यामुळे कंटेनर दुभाजकाला जाऊन धडकला. या अपघाताची माहिती वाहतूक पोलिसांसह ठामपा आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्यानंतर घटनास्थळी या दोन्ही विभागांनी धाव घेतली. अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडले होते.
तसेच नाशिक-मुंबई वाहिनीवरील वाहतूक सुमारे तासभर धीम्या गतीने सुरू होती. वाहतूक पोलीस कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने अपघातग्रस्त कंटेनर हायड्रा मशीन आणि टोविंग व्हॅनच्या सहाय्याने रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आला. तर पसरलेल्या तेलावर आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी माती पसरवली. त्यांनतर हा मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत झाल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेने दिली.