वृध्द दाम्पत्यांचा संशयास्पद मृत्यु, हत्येचा गुन्हा दाखल
By अजित मांडके | Updated: January 6, 2024 16:36 IST2024-01-06T16:36:09+5:302024-01-06T16:36:46+5:30
गळा दाबून त्यांची हत्या केली अशी माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे.

वृध्द दाम्पत्यांचा संशयास्पद मृत्यु, हत्येचा गुन्हा दाखल
ठाणे : घोडबंदर येथील मानपाडा भागातील रेंटलच्या इमारतीमधील एका सदनिकेत वृध्द दाम्पत्यांचा संशयास्पद मृतदेह आढळला होता. परंतु आता त्यांची हत्या झाली असल्याची माहिती पुढे आली आहे. गळा दाबून त्यांची हत्या केली अशी माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. त्यानुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
समशेर बहादूर सिंह (६८) आणि मिना समशेर सिंह (६५) अशी मृतांची नावे आहेत. दोघांच्याही अंगावर कोणत्याही जखमा आढळून आल्या नाहीत. तसेच घरातून सामान देखील चोरीला गेले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. अंबरनाथमध्ये राहणाºया त्यांच्या मुलाने याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मानपाडा येथील ठाणे महापालिकेच्या दोस्ती एम्पेरिया या इमारतीतील १४ व्या मजल्यावरील एका सदनिकेत समशेर आणि मिना हे राहात होते. तर मुलगा सुधीर हा अंबरनाथमध्ये त्याच्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी समशेर हे परिसरातील गृहसंकुलामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. तर त्यांची पत्नी घरातून दूध विक्रीचा व्यवसाय करते. सुधीर हा दररोज त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत असे. त्याप्रमाणे, बुधवारी रात्री समशेर यांना सुधीरने संपर्क साधून प्रकृतीची विचारपूस केली. त्यावेळी पोटात त्रास होत असल्याचे समशेर यांनी सांगितले होते.
गुरुवारी दुपारी सुधीर याने समशेर यांना पुन्हा संपर्क साधला. परंतु समशेर यांचा मोबाईल बंद होता. त्याने मिना यांना संपर्क साधला. त्यादेखील फोन उचलत नव्हत्या. त्यामुळे सुधीर हे गुरुवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास आई-वडिलांना भेटण्यासाठी मानपाडा येथील त्यांच्या निवासस्थानी आले. त्यावेळी घराचा अर्धवट दरवाजा उघडा होता. सुधीर घरामध्ये शिरले असता, त्यांचे मृतदेह त्याला आढळून आले. सुधीर यांनी आरडा-ओरड केल्यानंतर इमारतीतील रहिवासी त्याठिकाणी आले. त्यांनी तात्काळ याची माहिती चितळसर पोलिसांना दिली.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दाम्पत्याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने सुधीर यांनी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे, हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समशेर आणि मिना यांच्या अंगावर कोणत्याही जखमा आढळून आल्या नाहीत. तसेच घरातून कोणतेही सामान चोरीला गेलेले नाही. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण कळू शकेल अशी माहिती पोलिसांनी दिली. सुधीर हे घरात शिरल्यानंतर समशेर यांचा मृतदेह खाटेवर पडलेला होता. तर, मिना यांचा मृतदेह पालथ्या अवस्थेत पडलेला होता. त्यांच्या ओठांतून रक्त साखळलेले होते. तसेच मिना यांच्या हातातील बांगड्या इतरत्र पडलेल्या होत्या. अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली. तर पोसमार्टनमध्ये त्यांचा गळा दाबून हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार आता पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.