बेकायदेशीर जमाव जमवत चिथावणी, सरकारी अधिकाऱ्यास धक्का, टाळे तोडत नैसर्गिक तलावात मूर्ति विसर्जन करणाऱ्या २६ ते ३१ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 23:02 IST2025-08-30T22:59:41+5:302025-08-30T23:02:15+5:30
पालिका तलावाचे टाळे तोडून नैसर्गिक तलावात गणेश मुर्त्यांचे विसर्जन केल्या प्रकरणी शनिवार दि. ३० ऑगस्ट रोजी भाईंदर पोलीस ठाण्यात २६ ते ३१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेकायदेशीर जमाव जमवत चिथावणी, सरकारी अधिकाऱ्यास धक्का, टाळे तोडत नैसर्गिक तलावात मूर्ति विसर्जन करणाऱ्या २६ ते ३१ जणांवर गुन्हा दाखल
मिरारोड - मुंबई उच्च न्यायालय आदेश नुसार मीरा भाईंदर महापालिकेने कृत्रिम तलाव गणेश विसर्जन साठी उभारले आहेत. मात्र न्यायालयाचे आदेश आणि उपस्थित पोलीस - पालिका अधिकाऱ्यांना न जुमानता भाईंदर पश्चिमेच्या राई गावातील काहींनी लोकांना चिथावणी देत बेकायदा जमाव जमवला. पालिका तलावाचे टाळे तोडून नैसर्गिक तलावात गणेश मुर्त्यांचे विसर्जन केल्या प्रकरणी शनिवार दि. ३० ऑगस्ट रोजी भाईंदर पोलीस ठाण्यात २६ ते ३१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नैसर्गिक जलस्रोत मधील घातक प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने पीओपी मुर्त्यांच्या विसर्जनास बंदी आणली. मुंबई उच्च न्यायालयाने देखील नुकताच ६ फूट पर्यंतच्या पीओपी व अन्य मुर्त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावातच करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शासन परिपत्रक अनुषंगाने मीरा भाईंदर महापालिकेने शहरात ३५ कृत्रिम तलाव केले. नैसर्गिक तलाव बंद करत प्रवेशद्वारास टाळी मारली.
मात्र दिड दिवसांच्या विसर्जन वेळी राई गावातील ओम राऊत, मनीषा राऊत, मंगेश पाटील, प्रशांत म्हात्रे, हेमद्र भोईर, मनोज राऊत व अन्य यांनी गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करणार नाही, नैसर्गिक तलावताच करणार असे सांगून लोकांना चिथावणी देऊन बेकायदा जमाव जमवला. पोलिस आणि पालिकेचे अधिकारी यांनी त्यांना न्यायालयाच्या आदेशाची माहिती देत त्याचे पालन करा, शांतता राखा असे समजावून सांगून देखील ते कोणी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.
त्यामुळे राई गावात विसर्जन ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडू लागली. त्यावेळी काही लोकांनी मोरवा गावात गणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक तलावात करू दिले जात असल्याची व्हिडीओ क्लिप दाखवली. त्यावरून पालिका अधिकाऱ्यांनी मोरवा गावात नैसर्गिक तलावात विसर्जनाची परवानगी दिली तर आम्हाला का नाही ? अशी विचारणा केली जाऊ लागली.
पालिका तलावाच्या प्रवेशद्वारास असलेले टाळे तोडण्याचा प्रयत्न सुरु झाला. पोलिसांनी त्यांना रोखले असता ते आणखी आक्रमक झाले. पालिकेचे सहायक आयुक्त योगेश गुणीजन यांना मनीषा राऊत यांनी धक्का मारून बाजूला ढकलले असता पोलिसांनी गुणीजन यांना संरक्षण दिले. त्या वादावादी दरम्यान ओम राऊत व अन्य एकाने दगड घेऊन पालिका तलावाचे टाळे तोडून बळजबरीने आत घुसले व अनेक पीओपी व अन्य मुर्त्यांचे तलावात विसर्जन केले.
या घटनेने विसर्जनास गालबोट लागून तणावाचे वातावरण झाले. शनिवारी ३० ऑगस्ट रोजी गुणीजन यांच्या फिर्यादी वरून चिथावणी देत बेकायदा जमाव जमवून उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून सरकारी कामात अडथळा आणला. सरकारी कर्मचाऱ्यास धक्का मारून ढकलले आणि पालिका तलाव प्रवेशद्वाराचे टाळे तोडून नैसर्गिक तलावात मूर्ती विसर्जन केले म्हणून भाईंदर पोलिसांनी २६ ते ३१ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
राई गावातील ओम राऊत, मनीषा राऊत, मंगेश पाटील, प्रशांत म्हात्रे, हेमद्र भोईर, मनोज राऊत व अन्य २० ते २५ जण हे आरोपी असून पोलीस तपास करत आहेत.