थेंबथेंब वाचवणारा ८१ वर्षांचा व्रतस्थ जलदूत

By Admin | Updated: May 28, 2016 02:47 IST2016-05-28T02:47:43+5:302016-05-28T02:47:43+5:30

‘पाणी म्हणजे जीवन - पाणी वाचवा’ हे उपदेश नेहमीच आपण ऐकतो. पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य असतो. प्रत्यक्षात पाण्याचा थेंब वाचवण्यासाठी कळतनकळत आपण उदासीनच असतो.

The 81-year-old fastenant Jabethar, who saved Depthanb | थेंबथेंब वाचवणारा ८१ वर्षांचा व्रतस्थ जलदूत

थेंबथेंब वाचवणारा ८१ वर्षांचा व्रतस्थ जलदूत

- धीरज परब,  मीरा रोड

‘पाणी म्हणजे जीवन - पाणी वाचवा’ हे उपदेश नेहमीच आपण ऐकतो. पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य असतो. प्रत्यक्षात पाण्याचा थेंब वाचवण्यासाठी कळतनकळत आपण उदासीनच असतो. पण, वयाच्या ८१ व्या वर्षीदेखील पाण्याचा प्रत्येक थेंब अन् थेंब वाचवण्यासाठी धडपडणारे आबीद सुरती यांचे कार्य जलक्रांती घडवणारेच आहे.
सुरतींचा जन्म ५ मे १९३५ रोजी गुजरातला झाला. १९६५ मध्ये त्यांची तुुटेला फरिश्ता ही गुजरातीमधील पहिली कादंबरी प्रकाशित झाली. तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्या अनेक कथा-कादंबऱ्या, लघुकथा, लहान मुलांची कॉमिक, कार्टुन प्रकाशित झाली आहेत. तिसरी आँख या लघुकथेसाठी त्यांना १९९३ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. चित्रकार, लेखक, साहित्यिक असलेल्या सुरती यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत.
२००७ पासून आबीद यांनी ड्रॉप डेड फाउंडेशनच्या माध्यमातून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची मोहीम व जनजागृती सुरू केली आणि त्यांच्या या कार्याची दखल विविध स्तरावर मोठ्या प्रमाणात घेतली जाऊ लागली. हंडाभर पाण्यासाठी रांगेत ताटकळणारी आपली आई, ते राहत असलेल्या मीरा रोड परिसरात नेहमीच भेडसावणारी पाणीटंचाई, त्यातच मित्रांकडे गळणारा नळ पाहून आबीद अस्वस्थ होत. पाण्याचा थेंब गळतोय म्हणून सर्वसामान्यांचे त्याकडे होत असलेले दुर्लक्ष त्यांना नेहमीच सलत होते. यातूनच ड्रॉप डेड फाउंडेशन स्थापन झाली.
ड्रॉप डेड फाउंडेशनच्या माध्यमातून फेब्रुवारी २००७ पासून आबीद यांनी स्वत: मीरा रोड परिसरातील घराघरांत जाऊन गळके नळ विनामूल्य दुरुस्त करून देण्याची मोहीम हाती घेतली.
थेंबथेंब करून महिन्याला असे एका गळतीद्वारे हजारो लीटर शुद्ध पाणी वाया जाते. पहिल्याच वर्षात आबीद यांनी मीरा रोडमधील १ हजार ६६६ घरांना भेटी दिल्या. त्यात ४१४ गळके नळ त्यांनी विनामूल्य दुरुस्त केले. आजही प्रत्येक रविवारीते सोबत प्लम्बर घेऊन घरोघरी जातात. गेल्या नऊ वर्षांत त्यांनी हजारो नळांची दुरुस्ती करून लाखो लीटर पाणी वाचवले आहे. किंगखान शाहरूख खान यानेदेखील त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. नळांची गळती बंद करून पाणी वाचवण्यावरच आबीद थांबले नाहीत. पाणीबचतीसाठी व्यापक लोकसहभाग व जनजागृती आवश्यक असल्याची त्यांना कल्पना आहे. याबाबत जनजागृती करण्यातकरीता एक मिनिटांची लघुफिल्म बनवण्याची स्पर्धा ठेवली. परीक्षक म्हणून काम करण्यास अमोल गुप्ते, जुही चावला, शेखर कपूर यांच्यासारखे दिग्गज या मोहिमेसाठी तयार झाले.


प्रार्थनास्थळांमध्ये पोस्टर मोहीम
पाणीबचतीसाठी आता मशिदी व मंदिरांत पोस्टर मोहिमेची तयारी सुरू आहे. मोहम्मद साहेब यांनी पाण्याचे विशद केलेले महत्त्व पोस्टरच्या माध्यमातून प्रत्येक मशिदीमध्ये झळकेल. केवळ मुंबई वा देशातीलच नव्हे तर जगभरातील मशिदीमध्ये पाण्याचे महत्त्व सांगणारे व बचतीचे आवाहन करणारे पोस्टर लावण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे.

Web Title: The 81-year-old fastenant Jabethar, who saved Depthanb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.