भिवंडीत ८०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त; ३५ हजार रुपये दंड वसूल
By नितीन पंडित | Updated: December 28, 2023 19:34 IST2023-12-28T19:33:19+5:302023-12-28T19:34:16+5:30
मनपा प्रशासनाने सिंगल यूज प्लास्टिक बाळगणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली.

भिवंडीत ८०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त; ३५ हजार रुपये दंड वसूल
भिवंडी: पर्यावरणास घातक असलेल्या सिंगल यूज प्लास्टिकवर निर्बंध असतानाही शहरात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने महापालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईत ८०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलं असून प्लास्टिकचा वापर करणाऱ्या किराणा दुकानदारांकडून ३५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती मनपा प्रशासनाने गुरुवारी दिली आहे. महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी भिवंडी शहरात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे. या स्वच्छता मोहिमेत प्लास्टिक मुक्त भिवंडीचा संकल्प करण्यात आला आहे.गुरुवारी मनपा प्रशासनाने सिंगल यूज प्लास्टिक बाळगणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली.
शहरातील नजराना कंपाउंड,शिवाजीनगर,गुरुदेव फरसाण मार्ट, भिवंडी टॉकीज परिसर, तीनबत्ती बाजारपेठ, बॉम्बे फरसाण मार्ट या सर्व भागात पालिकेने विशेष मोहीम राबवली. यामध्ये एकूण ८०० किलो प्लास्टिक जप्त करून,ऋषभ प्लास्टिक, विनोद मगनलाल, गुरुदेव फरसाण मार्ट विक्रेते व इतरांकडून ३५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
या मोहिमेत आरोग्य विभाग सहायक आयुक्त फैसल तातली,पश्चिम विभाग प्रभाग समिती ४ व ५ चे आरोग्य निरीक्षक हेमंत गूळवी,आरोग्य निरीक्षक शशी घाडगे,राजेंद्र घाडगे, प्रभाग समिती क्रमांक ४ व ५ मधील आरोग्य कर्मचारी पथकाने कारवाई केली. यापुढे सिंगल यूज प्लास्टिक, प्रतिबंधात्मक प्लास्टिक विक्रेते, व वापरणाऱ्यांवर नियमानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी दिला आहे.
सिंगल यूज प्लास्टिक वापर करताना तीन वेळा आढळल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे आणि चौथ्या वेळेला नियमानुसार कायदेशीर गुन्हा दाखल होऊ शकतो. या पुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी दिली आहे.