कोरोना रुग्णांसाठी आणखी ७५ खाटा; रुग्णालयाचे खासदारांच्या हस्ते झाले लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 04:18 IST2020-09-19T04:17:49+5:302020-09-19T04:18:17+5:30
श्रीकांत शिंदे म्हणाले, ‘कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी एप्रिलपासून महापालिकेचे आयुक्त व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जम्बो सेटअप उभारण्यास सुरुवात केली.

कोरोना रुग्णांसाठी आणखी ७५ खाटा; रुग्णालयाचे खासदारांच्या हस्ते झाले लोकार्पण
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने कोरोना रुग्णांवर उपचारासाठी डोंबिवली क्रीडासंकुलातील टेनिस कोर्टच्या लॉनवर उभारलेल्या कोविड रुग्णालयाचे लोकार्पण शुक्रवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी आणखी ७५ खाटा उपलब्ध होणार आहेत.
रुग्णालयाच्या लोकार्पणप्रसंगी आमदार रवींद्र चव्हाण, महापौर विनीता राणे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, डॉ. प्रतिभा पानपाटील, वन रुपी क्लिनिक्सचे राहुल घुले, नगरसेवक राजेश मोरे, शैलेश धात्रक, विश्वनाथ राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीकांत शिंदे म्हणाले, ‘कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी एप्रिलपासून महापालिकेचे आयुक्त व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जम्बो सेटअप उभारण्यास सुरुवात केली. त्या वेळी रुग्ण कमी असताना इतकी मोठी यंत्रणा उभी करण्याची गरज काय, असा सवाल काही मंडळी उपस्थित करत होती. गणेशोत्सवात नागरिकांचा संपर्क वाढल्याने सध्या पुन्हा रुग्ण वाढत आहेत. अनलॉकमध्ये अनेक व्यवसायांना मुभा दिली आहे. त्यामुळे रुग्ण वाढत असताना जम्बो सेटअप हाच उपचारासाठी उपयुक्त ठरणार आहे.’
चव्हाण म्हणाले, ‘महापालिकेने जम्बो सेटअप अंतर्गत चांगल्या आरोग्य सुविधा उभारल्या आहेत. मात्र, खाजगी रुग्णालयांत कोविड रुग्णांकडून बिलाच्या नावाखाली जास्तीचे पैसे घेतले जात आहेत. त्यावरही महापालिकेचे चांगल्या प्रकारे नियंत्रण असावे. तसेच कोरोनाग्रस्त पत्रकारांसाठी महापालिकेने खाटा राखीव ठेवाव्यात.’ दरम्यान, या मागणीस खासदारांनी होकार दिला आहे. तर, प्रशासनानेही मान्य केले आहे.
‘चाचण्यांचे प्रमाण वाढवणार’
- सूर्यवंशी यांनी सांगितले, मार्चपासून महापालिकेची यंत्रणा काम करत असल्याने हे जम्बो सेटअप, कोविड रुग्णालये उभारणे शक्य झाले आहे. अन्य महापालिकांच्या तुलनेत आपल्या महापालिका हद्दीत कोविड चाचण्यांचा दर सगळ्यात जास्त आहे. चाचण्या आणखी वाढवल्या जाणार आहेत.
- कोरोनाचे लवकर निदान झाले तर त्यावर त्वरित उपचार करून रुग्णाचा जीव वाचवता येऊ शकतो. त्यामुळे महापालिका हद्दीतील कोरोनाचा मृत्युदर हा दोन टक्केच्या आत आहे. तर, उपचाराअंती बरे झालेल्यांची टक्केवारी आजमितीस ८५ टक्के आहे.
- चाचण्या वाढवत असताना रुग्णसंख्या वाढत आहे. येत्या काळात दिवसाला ९०० रुग्णही पॉझिटिव्ह आले तरी त्यांच्या उपचारासाठी ९०० खाटांची व्यवस्था सज्ज आहे.