अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 05:56 IST2025-12-21T05:56:02+5:302025-12-21T05:56:30+5:30
Ambernath Nagar palika Election: मतदानास अनेक ठिकाणी हाणामारीचे गालबोट लागले. मतदान सुरू असताना अनेक मतदान केंद्रांवर वादावादी आणि हाणामारीच्या घटना घडल्या.

अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीसाठी शनिवारी सायंकाळपर्यंत ५४.५० टक्के मतदान झाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत पालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी १० टक्क्यांनी वाढल्याचे निदर्शनास आले. मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचा नेमका लाभ कोणाला होणार हे आज, रविवारी होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. मतदानास अनेक ठिकाणी हाणामारीचे गालबोट लागले. मतदान सुरू असताना अनेक मतदान केंद्रांवर वादावादी आणि हाणामारीच्या घटना घडल्या.
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगराध्यक्षपदी मंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयनकुंवर रावल आणि सर्व नगरसेवक बिनविरोध निवडून गेले आहेत.
२ जळगाव जिल्ह्यातील जामनेरच्या नगराध्यक्षपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या आधीच बिनविरोध निवडून गेल्या आहेत. तसेच, भाजपचे नऊ नगरसेवक देखील बिनविरोध जिंकले आहेत, पण उर्वरित १७ जागांसाठी मतदान झाले. त्याचा निकालही उद्या रविवारी लागणार आहे.
पैसे वाटप करताना भाजप कार्यकर्ते ताब्यात
शुक्रवारी रात्री मतदारांना पैसे वाटप करीत असताना भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पकडून भरारी पथकाच्या स्वाधीन केले. या दोन्ही भाजप पदाधिकाऱ्यांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
अंबरनाथ पश्चिमेच्या पॅनल क्रमांक १५ मधील मातोश्रीनगर परिसरात सकाळी ११च्या सुमारास मतदान केंद्राच्या बाहेर दोन्ही उमेदवारांचे गट समोरासमोर आल्याने गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली.