Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 10:29 IST2025-06-09T10:24:08+5:302025-06-09T10:29:13+5:30
Thane Mumbra Railway Accident: मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ काही प्रवासी ट्रेन मधून पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
Mumbai Train Accident: मध्य रेल्वेच्या दिवा- मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. फास्ट लोकल एकमेकांच्या शेजारून जात असतानाच हा भीषण अपघात झाला. मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान सीएसएमटी लोकल आणि कसारा लोकल एकमेकांना ओलांडत असताना ही घटना घडली. एक लोकल कसाऱ्याकडे तर दुसरी कसारा लोकल ही सीएसएमटीकडे जात असताना ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आणि जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
सीएएमटीकडून कसाऱ्याकडे जाणाऱ्या फास्ट लोकलमधून पडून या प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दुसरी लोकल सीएसएमटीकडे जात असताना कसारा फास्ट लोकल बाजूने जात होती. त्याचवेळी आठ प्रवासी हे लोकल ट्रेनमधून पडले. यामध्ये सात पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.
"पाच प्रवासी मुंब्रा स्थानकाच्या जवळ एका ट्रेनमधून पडल्याची माहिती मिळाली आहे. ही गाडी कसाऱ्याला जात होती. त्यातील गार्डने ही माहिती दिली. दिवा आणि मुंब्रा येथून रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे," अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल लीला यांनी दिली.
"ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर सीएसएमटीकडे जाणारे काही प्रवासी ट्रेनमधून पडले. ट्रेनमध्ये जास्त गर्दी असल्याने हा अपघात झाल्याचे मानले जात आहे. रेल्वे प्रशासन आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे. अपघाताची चौकशी सुरू झाली आहे. या घटनेमुळे स्थानिक सेवांवरही परिणाम झाला आहे," अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.