ठाण्यात चार हजार परवानाधारक शस्त्र झाली म्यान, ५९ बेकायदेशीर रिव्हॉल्व्हर जप्त
By जितेंद्र कालेकर | Updated: November 19, 2024 22:30 IST2024-11-19T22:30:39+5:302024-11-19T22:30:56+5:30
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर १५ ऑक्टाेबर २०२४ पासून आचारसंहिता लागू झाली.

ठाण्यात चार हजार परवानाधारक शस्त्र झाली म्यान, ५९ बेकायदेशीर रिव्हॉल्व्हर जप्त
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: विधानसभा निवडणूकीमुळे आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे तसेच पोलिसांचा मनाई आदेशही लागू असल्यामुळे मतदान प्रक्रीया शांततेत पार पडण्यासाठी ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातील चार हजार ४५२ परवानाधारक शस्त्र धारकांपैकी तब्बल तीन हजार ८०५ शस्त्रे पोलिसांकडे जमा झाली आहेत. तर ३० शस्त्रांचा परवाना रद्द झाल्यामुळे ती पोलिसांकडे जमा झाली. त्याचबरोबर कोंबिंग ऑपरेशन दरम्यान ५९ बेकायदेशीर शस्त्रे आणि ८५ जिवंत काडतुसे जप्त केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी मंगळवारी दिली.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर १५ ऑक्टाेबर २०२४ पासून आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर पोलिस ठाणे पातळीवर विशेष अभियानांतर्गत कोंबिंग ऑपनेशन, ऑपरेशन ऑल आऊट आदी विविध मोहिमा राबवून आतापर्यंत ५९ गावठी कट्टे आणि रिव्हॉल्व्हर तसेच चाकू आणि सुरे अशी २५२ हत्यारे जप्त करुन संबंधितांवर कडक कारवाई केली आहे.
मतदान कालावधीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परवानाधारक चार हजार ४५२ पैकी तीन हजार ८०५ रिव्हॉल्व्हरसारखी शस्त्रे पोलिसांकडे जप्त झाली. यातून धोका असलेले नामांकित बिल्डर, डॉक्टर आणि काही राजकीय पदाधिकारी अशा ४६४ जणांना या मनाई आदेशातून वगळले आहे.
गेल्या महिनाभरात सुमारे १३ हजार लीटर बेकायदेशीर देशी, विदेशी आणि गावठी दारु जप्त केली. याशिवाय, गावठी दारु तयार करण्यासाठी लागणारे एक लाख ४५ हजार ३२० लीटर रसायन नाश केले आहे. त्याचबरोबर ६५ किलोग्राम गांजा, एमडी आणि एक कोटी दोन लाख ७२ हजार २१८ रुपयांचा गुटखाही जप्त केला आहे.
नाकाबंदीमध्ये नऊ कोटी १३ लाखांची रोकड जप्त -
सनिक पोलिस आणि निवडणूकीसाठी सपन केलेले एसएसटी तसेच एसएसटी पथकामार्फत आचारसंहिता लागू झाल्यापासून नऊ कोटी १३ लाख ७१ हजार ६०० रुपये इतकी बेहिशोबी रोकड तसेच १३ लाख २६ हजार ३७७ रुपयांचे मौल्यवान सोने आणि चांदी जप्त केली आहे.
‘‘ निवडणूक प्रक्रीया सुरळीत पार पडावी, यादृष्टीने सर्वतोपरी उपाययोजना केली आहे. पोलिस यंत्रणा सुसज्ज आहे. सर्व नागरिकांनी भयमुक्त वातावरणात मतदानाचा हक्क बजवावा.’’ आशुतोष डुंबरे, पोलिस आयुक्त, ठाणे शहर.