उल्हासनगरात अंबिका इमारतीचा स्लॅब कोसळून 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, आजी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 13:39 IST2019-07-28T13:38:37+5:302019-07-28T13:39:32+5:30
पवई चौकातील अंबिका इमारतीमधील पाचव्या मजल्याचा स्लॅब चौथ्या मजल्यावर पडून साडेतीन वर्षांचा नीरजचा मृत्यू झाला.

उल्हासनगरात अंबिका इमारतीचा स्लॅब कोसळून 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, आजी जखमी
- सदानंद नाईक
उल्हासनगर : पवई चौकातील अंबिका इमारतीमधील पाचव्या मजल्याचा स्लॅब चौथ्या मजल्यावर पडून साडेतीन वर्षांचा नीरजचा मृत्यू झाला. तर आजी पंचशीलाबाई जखमी झाली असून, सुरक्षेचा उपाय म्हणून इमारत खाली करण्यात आली आहे. उल्हासनगर कॅम्प नं-४ पवई चौकातील अंबिका इमारती असून, सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास 5 व्या मजल्याच्या स्लॅब चौथ्या मजल्यावर पडून घरात खेळणाऱ्या साडेतीन वर्षांच्या नीरज सातपुते याचा जागीच मृत्यू झाला.
तर निरजची आजी पंचशीलाबाई जगताप गंभीर जखमी झाला आहे. आपत्कालीन विभागाचे प्रमुख गणेश शिंपी, अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन सुरेक्षाचा उपाय म्हणून इमारतीतील तब्बल 25 प्लॉटधारकांना बाहेर काढण्यात आले. महापालिकेने त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती. मात्र प्लॉटधारकांनी मित्र व नातेवाईकांकडे जाणे पसंत केले. सदर इमारत धोकादायक इमारतीच्या यादीत नसून अश्या शेकडो इमारती शहरात असल्याचे बोलले जात आहे.
अंबिका इमारत 20 वर्षांपूर्वीची जुनी इमारत असून, इमारतीत एकून 25 प्लॉट व तळमजल्यावर तीन दुकाने आहेत. 4 वर्षांच्या निरजच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शहरात सव्वा दोनशे इमारती अतिधोकादायक व धोकादायक असून, अंबिका सारख्या इमारतीची संख्या शेकडोच्या शहरात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी केला आहे. तर आयुक्त सुधाकर देशमुख घटनेकडे लक्ष ठेवून असून 20 वर्ष जुन्या इमारतीचे स्ट्रॅक्चर ऑडिट करण्याचे संकेत दिले आहे.