घोडबंदर मार्गवर ट्रेलरने दोन वाहनांना दिलेल्या धडकेत ४ जखमी
By धीरज परब | Updated: September 6, 2023 20:30 IST2023-09-06T20:30:06+5:302023-09-06T20:30:22+5:30
आधीच तीव्र वळण त्यात मोठी होर्डिंग्ज असल्याने चालकांचे लक्ष येथे सहज विचलित होते. त्यामुळे येथे नेहमी अपघात होत असतात.

घोडबंदर मार्गवर ट्रेलरने दोन वाहनांना दिलेल्या धडकेत ४ जखमी
मीरारोड - काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत घोडबंदर मार्गावरील काजूपाडा येथे एका ट्रेलर चालकाने कार व टेम्पोला दिलेल्या धडकेने झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. काजूपाडा येथे तीव्र वळण आहे . त्यातच ह्या तीव्र वळणावर भलीमोठी लांबलचक दोन मोठी होर्डिंग आहेत. आधीच तीव्र वळण त्यात मोठी होर्डिंग्ज असल्याने चालकांचे लक्ष येथे सहज विचलित होते. त्यामुळे येथे नेहमी अपघात होत असतात.
बुधवारी देखील काजूपाडाच्या सदर तीव्र वळणावर ठाण्या कडून येणाऱ्या व वरसावे नाका दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर एमएच ४६ एएस २३२७ क्रमांकाच्या ट्रेलर चालकाचे सदर वळणावर नियंत्रण सुटले . त्याने लगत असलेल्या एमएच ०३ डीएक्स ३२०८ क्रमांच्या कार आणि एमएच ०४ केयु ०३९२ क्रमांकाच्या टेम्पोला जबर धडक दिली.
या धडकेत कार व टेम्पो सह ट्रेलर देखील रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात जाऊन पडला . त्यात कार चालक , टेम्पोतील चालक व मजूर तसेच ट्रेलर मधील क्लिनर हे जखमी झाले . त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . दरम्यान अपघाता नंतर ट्रेलर चालक पसार झाला.
वाहतूक पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना रुग्णालयात पाठ्वण्यासह वाहतूक सुरळीत केली . तसेच अपघात ग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने काढण्याचे काम सुरु केले . या प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे .तर टेम्पोतील मजुराच्या फिर्यादी वरून पोलिसांनी बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ट्रेलर चालकावर भादंवि , मोटार वाईन कायदा नुसार गुन्हा दाखल केला आहे . मात्र जखमींची नावे पोलिस ठाण्यात सायंकाळ पर्यंत उपलब्ध नव्हती.