सहा महिन्यात ठाण्यात ३८१ वृक्ष धारातीर्थ
By अजित मांडके | Updated: July 1, 2024 16:20 IST2024-07-01T16:19:06+5:302024-07-01T16:20:16+5:30
ठाण्यात अजूनही म्हणाव्या त्या प्रमाणात पावसाला सुरवात झालेली नाही.

सहा महिन्यात ठाण्यात ३८१ वृक्ष धारातीर्थ
ठाणे : ठाण्यात अजूनही म्हणाव्या त्या प्रमाणात पावसाला सुरवात झालेली नाही. मात्र असे असले तरी देखील महापालिका हद्दीत मागील सहा महिन्यात ३८१ वृक्ष उन्मळून पडल्याची घटना पुढे आल्या आहेत. तर २९० वृक्षांच्या फांद्या पडल्याचे दिसून आले आहे. त्यातही मे महिन्यात १५५ आणि जून महिन्यात १७४ वृक्ष उन्मळून पडल्याचे दिसून आले आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसली तरी देखील वाहनांचे नुकसान यात झाल्याचे दिसत आहे. पावसाळा सुरु झाला की ठाण्यात वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसत आहे.
मागील वर्षी देखील शहरात शेकडो वृक्ष उन्मळून पडले होते. मागील दोन वर्षापासून महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत धोकादायक वृक्षांचा सर्व्हे केला जात आहे. परंतु असे असले तरी देखील धोकादायक वृक्षांसह इतरही वृक्ष उन्मळून पडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वृक्ष प्राधिकरण विभागाच्या कारभारावरच या निमित्ताने संशय व्यक्त केला जात आहे. त्यातही जे वृक्ष उन्मळून पडत आहेत. त्यात वेदेशी वृक्षांची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे. २०२०-२१ या वर्षात एकूण ६२८ झाडे उन्मळून पडली आहेत तर या वर्षी ऑगस्टपर्यंत हा आकडा ४६५ च्या घरात पोहचला आहे.
ही आकडेवारी शहरातील भीषण परिस्थिती दर्शवत आहे. मागील काही वर्षात शहरातील झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र वृक्ष का पडत आहेत, याचा अभ्यास करण्यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाला वेळ नाही. यामागे शहरातील वाढलेले काँक्रीटीकरण देखील वृक्षांच्या मुळावर येत असल्याचा दावा तज्ञांनी केली आहे. काही झाडे आतून पोखरली देखील जात असल्याने ती कधीही उन्मळून पडू शकतात. त्यामुळे आता अशा झाडांचे सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला होता.
ठाणे शहरात नेमकी अशी किती झाडे आहेत याचे सर्व्हेक्षण करण्यात येणार होता. त्यासाठी जर्मन तंत्रज्ञान वापरून अशाप्रकारचे सर्व्हेक्षण करण्याचे नियोजन आखण्यात आले होते. परंतु त्याचे पुढे काय झाले याचे उत्तर अद्यापही महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे नाही. त्यामुळे शहरात दिवसेंदिवस वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना वाढतांनाच दिसत आहेत. दरम्यान यंदाच्या वर्षी देखील जानेवारी ते जुन अखेर पर्यंत महापालिका हद्दीत ३८१ वृक्ष उन्मळून पडले आहेत. तर २९० वृक्षांच्या फांद्या पडल्या आहेत. मात्र अद्यापही वृक्ष प्राधिकरण विभाग ढिम्मच असल्याचे दिसत आहे.
महिना - वृक्ष पडणे - फांड्या पडणे
जानेवारी - ०७ - ०६
फेब्रुवारी - १० - १०
मार्च - १६ - २४
एप्रिल - १९ - २२
मे - १५५ - ९४
जून - १७४ - १३४
एकूण - ३८१ - २९०