कंटेनमेंट झोन २८० च्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 00:46 IST2020-06-04T00:46:00+5:302020-06-04T00:46:10+5:30
ठाणे महापालिका क्षेत्र : साहाय्यक आयुक्तांना दिले झोनची हद्द ठरविण्याचे अधिकार

कंटेनमेंट झोन २८० च्या घरात
ठाणे : लॉकडाउन उघडण्याचा पहिला टप्पा जाहीर झाला असून तो कंटेनमेंट झोन वगळून असणार आहे. मात्र, शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून ठामपा हद्दीतील कंटेनमेंट झोनही वाढत आहेत. सध्या या झोनची संख्या २८० च्या घरात असल्याची माहिती मनपाने दिली. तसेच, या झोनची हद्द ठरवण्याचे अधिकार सहाय्यक आयुक्तांना दिल्याचे या आदेशात म्हटले आहे.
शहरातील प्रत्येक प्रभाग समितीत हे झोन आहेत. कोणते भाग सुरू करणार याबाबत ५ जूननंतरच स्पष्ट होणार आहे. आठ दिवसांत कंटेनमेंट झोनमध्ये ४५ ची भर पडली आहे. २६ मे पर्यंत २३५ कंटेनमेंट झोन होते. शहरात टेस्ट करण्याचे प्रमाण वाढल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. ज्या-ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे ते भाग कंटेनमेंट झोन म्हणून प्रशासनातर्फे घोषित केले आहेत. यात वागळे इस्टेट, लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ मुंब्रा, नौपाडा, कोपरी या भागांतही कंटेनमेंट झाले वाढले आहेत. कंटेनमेंट झोन वगळता इतर भागात सम-विषम तारखेनुसार व्यवहार सुरळीत होणार आहेत. कंटेनमेंट झोनची हद्द ठरवण्याचे अधिकार हे आता सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत.
उल्हासनगरमध्ये चार कोरोनाबाधितांचा मृत्यू
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये बुधवारी १५ नवे रुग्ण आढळून आले असून चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास मोहनालकर यांनी दिली आहे. आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू, तर १७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कॅम्प नं. २ परिसरात चार, कॅम्प नं. ३ परिसरात पाच आणि कॅम्प नं. ४ परिसरात तीन, तर कॅम्प नं. ५ मध्ये दोन रुग्ण आढळले आहेत.