अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 07:09 IST2025-12-21T07:09:29+5:302025-12-21T07:09:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ नगर परिषद निवडणूक मतदानाच्या दिवशी शनिवारी दुसऱ्या शहरातून बोगस मतदार आणल्याच्या आरोपामुळे शनिवारी शहरात एकच ...

अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ नगर परिषद निवडणूक मतदानाच्या दिवशी शनिवारी दुसऱ्या शहरातून बोगस मतदार आणल्याच्या आरोपामुळे शनिवारी शहरात एकच खळबळ माजली. पश्चिमेला एका मंगल कार्यालयाच्या सभागृहात महिलांची गर्दी जमल्याचे उघडकीस आल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले. या हॉलमध्ये १७३ व्यक्ती आल्याचा प्रकार काँग्रेस आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पहाटे उघडकीस आणला.
अंबरनाथ पश्चिमेला कोहोजगाव परिसरातील कृष्णा मॅरेज हॉल येथे काही महिला एकत्र जमल्या होत्या. हे नागरिक स्थानिक मतदार नसल्याचा दावा करण्यात येत असून बाहेरून, विशेषतः भिवंडी परिसरातून त्यांना बोगस मतदानासाठी आणल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस आणि निवडणूक विभागाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित महिलांना ताब्यात घेतले असून, चौकशी करण्यात आली.
अंबरनाथमधील एका मंगल कार्यालयात महिला मोठ्या संख्येन एकत्र आल्या होत्या. बोगस मतदानासाठी त्यांना आणण्यात आले होते, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला.
निवडणुकीत अनेक ठिकाणी अशांतता
निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अंबरनाथमध्ये शनिवारी सकाळी अनेक ठिकाणी दोन गटांत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. कोळगाव परिसरात मतदान केंद्रात हाणामारीच्या घटना घडल्या. अनेक प्रभागांत मतदारांचा गोंधळ उडाला होता. त्यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले.
मतदान यंत्र बंद पडल्यामुळे अनेक ठिकाणी मतदारांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागले. शिवनगर परिसरातील मतदान यंत्र दोन वेळा बंद पडल्याने गोंधळ निर्माण झाला होता. त्याच ठिकाणी कार्यकर्ते मतदान केंद्रात जात असल्याने वाद निर्माण झाला आणि त्यांच्यात बाचाबाची झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७३ व्यक्ती शासकीय अधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान करून कृष्णा मॅरेज हॉल येथे एकत्र जमल्या होत्या. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्यांना नोटीस बजावून सोडण्यात आले. तसेच हॉलचे मालक कृष्णा रसाळ पाटील यांच्यावर विनापरवानगी काही व्यक्ती जमवल्याबद्दल कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती परिमंडळ ४ चे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.
काँग्रेस, भाजपच्या कार्यकर्त्यांची हॉलवर धडक
रॉयल पार्क, पाले गाव, चिखलोली कोहजगाव, स्वामीनगर भागातील अनेक मतदारांना स्थलांतरित केल्यामुळे त्यांना या केंद्रातून त्या केंद्रात भटकंती करावी लागली. अनेक ठिकाणी वादावादीच्या घटना घडल्याने दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले होते.
अंबरनाथच्या कृष्णा मॅरेज हॉलमध्ये काही महिला मोठ्या संख्येने एकत्रित आल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली होती. त्यांनी राजकीय पक्षांना याची माहिती दिल्यानंतर काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी या हॉलवर धडक देत हा प्रकार उघडकीस आणला.
रात्री दोन वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर राजकीय नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांना फोन केले. दोन्ही बाजूकडून दबाव असल्याने या प्रकरणात काय करावे हे पोलिसांच्याही लक्षात आले नव्हते.