दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी १७ कोटी; उल्हासनगरात दसऱ्याच्या मुहूर्तावर डांबरीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 19:39 IST2021-10-15T19:39:01+5:302021-10-15T19:39:07+5:30
उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी साडे सहा कोटींची तरतूद केली होती.

दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी १७ कोटी; उल्हासनगरात दसऱ्याच्या मुहूर्तावर डांबरीकरण
- सदानंद नाईक
उल्हासनगर : पावसाने विश्रांती घेताच दसऱ्याच्या मुहूर्तावर महापालिकेने रस्त्याचे डांबरीकरण सुरू केले असून दिवाळी पूर्वी रस्ते चकाचक दिसणार असल्याची प्रतिक्रिया महापौर लिलाबाई अशान यांनी दिली. रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी १७ कोटीच्या निधीची तरतूद केली.
उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी साडे सहा कोटींची तरतूद केली होती. मात्र पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरले नसल्याने, रस्त्याची दुरावस्था झाली. लहान-मोठे अपघात होऊन वाहन चालक व नागरिक हैराण झाले.
दरम्यान रस्त्याची दुरावस्था पाहून महापालिका बैठकीत महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, आयुक्त डॉ राजा दयानिधी, उपायुक्त अशोक नाईकवाडे, शहर अभियंता महेश शितलानी यांनी १० कोटींचा वाढीव निधीला मंजुरी दिल्याची माहिती बांधकाम विभागाचे उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. गेल्या महिन्यात रस्ते डांबरीकरण व रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम सुरू होताच, सायंकाळच्या दरम्यान दररोज पावसाने हजेरी लावली. अखेर रस्ता डांबरीकरणचे काम काही काळापुरते थांबविले होते.
पावसाने विश्रांती घेतल्यावर महापालिका बांधकाम विभागाने ठेकेदारा द्वारे रस्त्याचे डांबरीकरण व रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम सुरू केले. कुर्ला कॅम्प काली माता रस्त्यासह इतर रस्त्याचे डांबरीकरण महापालिकेने सुरू केले. दिवाळी पर्यंत शहरातील रस्ते चकाचक होणार असल्याची माहिती महापौर लिलाबाई अशान यांनी दिली. तसेच वाहन चालक व नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. शहरातील नेताजी चौक ते कुर्ला कॅम्प रस्ता, संभाजी चौक ते पाच दुकान रस्ता, गुरुनानक शाळा रस्ता, पवई चौक ते विठ्ठलवाडी रस्ता, फॉरवर्ड लाईन ते मध्यवर्ती रुग्णालय रस्ता, खेमानी रस्ता, डॉल्फिन रस्ता, मोर्यानगरी रस्ता, काली माता मंदिर चौक रस्ता ते कैलास कॉलनी रस्ता आदी रस्त्याची दुरावस्था झाली आहे.