केडीएमसी हद्दीत १६२ अतिधोकादायक इमारती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:30 IST2021-06-01T04:30:32+5:302021-06-01T04:30:32+5:30
कल्याण : पावसाळ्याच्या तोंडावर धोकादायक बांधकामांचे सर्वेक्षण केडीएमसीकडून पूर्ण झाले असून यंदा कल्याण डोंबिवलीत धोकादायक बांधकामे २८५, तर ...

केडीएमसी हद्दीत १६२ अतिधोकादायक इमारती
कल्याण : पावसाळ्याच्या तोंडावर धोकादायक बांधकामांचे सर्वेक्षण केडीएमसीकडून पूर्ण झाले असून यंदा कल्याण डोंबिवलीत धोकादायक बांधकामे २८५, तर अतिधोकादायक बांधकामे १६२ आहेत. अतिधोकादायक इमारतींवर तातडीने कारवाई अपेक्षित असताना केवळ नोटिसा बजावण्यापुरती कारवाई सीमित राहत असल्याचे मागील तीन वर्षांतील आकडेवारी पाहता स्पष्ट होते. परिणामी, धोकादायक बांधकामांत वास्तव्य करणाऱ्यांवरील टांगती तलवार ‘जैसे थे’ आहे.
महापालिका क्षेत्रातील धोकादायक आणि अतिधोकादायक बांधकामे ४४७ आहेत. गेल्यावर्षी ती ४६४ होती. २०१९ मध्ये या बांधकामांची संख्या ४७३ होती. धोकादायक बांधकामांवर कारवाई सुरू असल्याचा दावा महापालिका दरवर्षी करत असली तरी आकडेवारी पाहता कारवाईचा दावा फोल आहे. गेल्यावर्षी व यंदाच्या वर्षी अतिधोकादायक बांधकामांची तुलना केली तर केवळ २८ अतिधोकादायक बांधकामांवर कारवाई झाली अथवा त्यापैकी काही कोसळली. २०२० मध्ये कोरोनामुळे मार्च महिन्यात लॉकडाऊन लागू झाला. यंत्रणा त्यात व्यस्त असल्याने प्रभावीपणे कारवाई होऊ शकली नाही, अशी कारणे दिली जात आहेत. यंदाही कोरोनाचे सावट कायम आहे. कोरोनाच्या संकटात आम्ही दुसरीकडे जाणार तरी कुठे, असा सवाल धोकादायक इमारतीत राहणाऱ्यांकडून केला जातोय. मालक-भाडेकरू वादामुळेही कारवाईला मर्यादा येतात. काही बांधकामाचे वाद हे न्यायप्रविष्ट असल्याने अशांवर कारवाई करता येत नाही. रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे लागते तर धोकादायक बांधकामांवरील कारवाई रोखण्यास बहुतांश वेळा तेच कारण असते. पुनर्वसन केले जात नाही तोपर्यंत घरे खाली न करण्याचा रहिवाशांचा पवित्रा असतो. उल्हासनगर शहरात इमारत कोसळून रहिवासी दगावल्याच्या दोन घटना अलीकडेच घडल्या. कल्याण डोंबिवलीत अतिधोकादायक बांधकामांची संख्या १६२ इतकी प्रचंड आहे. त्यामुळे या इमारतींमध्ये वास्तव्य करणाऱ्यांमधील ‘भय इथले संपत नाही’ हे चित्र दरवर्षी पाहायला मिळते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या तोंडावर उशिरा इमारतींची यादी जाहीर झाली. त्यामुळे अतिधोकादायक बांधकामांवर कशा प्रकारे कारवाई केली जाते हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
------------------------------------------------------
सर्वाधिक बांधकामे ‘फ’ प्रभागात
सर्वाधिक १७४ धोकादायक बांधकामे डोंबिवलीमधील ‘फ’ प्रभागात आहेत. त्याखालोखाल ‘क’ प्रभागात १२२ इमारती आहेत. ‘ह’ प्रभागातील संख्या ३८ आहे. ‘ग’ प्रभागात ३६, ‘जे’ प्रभागमध्ये ३४, ‘ब’ प्रभागात २२, ‘अ’ प्रभागामध्ये १०, ‘ड’ प्रभागात सात तर ‘ई’ प्रभागात चार धोकादायक बांधकामे आहेत. ‘आय’ प्रभागात एकही बांधकाम धोकादायक नाही.
------------------------------------------------------