ठाण्याच्या अर्थसंकल्पासाठी १६०० सूचना
By Admin | Updated: March 20, 2017 02:08 IST2017-03-20T02:08:25+5:302017-03-20T02:08:25+5:30
ठाण्याचा अर्थसंकल्प तयार करताना त्यात नागरिकांच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतिबिंब पडावे म्हणून त्यांच्या सूचना मागवण्याचा

ठाण्याच्या अर्थसंकल्पासाठी १६०० सूचना
ठाणे : ठाण्याचा अर्थसंकल्प तयार करताना त्यात नागरिकांच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतिबिंब पडावे म्हणून त्यांच्या सूचना मागवण्याचा प्रयोग आयुक्त संजीव जयस्वाल यांनी करताच १६०० हून अधिक ठाणेकरांनी त्याला उत्साहवर्धक प्रतिसाद दिला आहे. या सूचनांचे स्वरूप अद्याप जाहीर केले नसले; तरी शिवसेनेला हात देणाऱ्या घोडबंदर, पोखरण रोड या परिसरातून सर्वाधिक सूचना आल्या आहेत. त्यामुळे नगरसेवक निधी कसा खर्च करावा, याबाबत आपल्या मतदारांची भूमिका शिवसेना मान्य करते की पालिकेचा हा प्रयोग हे नगरसेवकांच्या अधिकारावर अतिक्रमण आहे, ही भूमिका कायम ठेवते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महापालिकेच्या संकेतस्थळावर हजारांहून जास्त नागरिकांनी अर्थसंकल्पाविषयी त्यांच्या असलेल्या अपेक्षा आणि सूचना मांडल्या आहेत. घोडबंदर आणि पोखरण रोड परिसरातील रस्ता रु ंदीकरणानंतर अग्निशमन विभाग आणि पाणी व्यवस्थापनासाठी अर्थसंकल्पामध्ये जास्त तरतूद करण्याची अपेक्षा मांडण्यात आली आहे. सांडपाण्याचा निचरा, रस्त्यांचा विकास, पार्किंग आणि वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध करून द्यावा, असे या नागरिकांचे म्हणणे आहे.
अर्थसंकल्पात सर्वसामान्य ठाणेकारांच्या सूचनांचा समावेश करण्याच्या आयुक्तांच्या निर्णयाला लोकप्रतिनिधींचा थेट विरोध नसला, तरी लोकप्रतिनिधींच्या अधिकारांवर गदा आणण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका सुरू झाली आहे. त्यामुळे आपल्या मतदारांच्या सूचनांना प्राधान्य द्यायचे की आपल्या अधिकाराचा मुद्दा ताणून धरायचा अशी विचित्र कोंडी यामुळे नगरसेवकांची होणार आहे.
आपले प्रश्न सुटावेत, रोजचे जगणे-प्रवास अधिका सुखकर व्हावा, यावर या मतदारांचा भर आहे. पालिकेच्या वेबसाईटवर हजारांहून अधिक आणि ठिकठिकाणी ठेवलेल्या ड्रॉप बॉक्समध्ये ६०० पेक्षा अधिक नागरिकांनी सूचना टाकल्या आहेत. यात संपूर्ण ठाणे शहरातून सूचना आल्या असल्या, तरी घोडबंदर, पोखरण पट्ट्यातील नागरिकांचा अधिक सहभाग आहे. (प्रतिनिधी)