मीरा भाईंदरमध्ये मासेमारी करण्यास गेलेला 16 वर्षाचा मुलगा बुडाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 14:29 IST2018-06-15T14:29:11+5:302018-06-15T14:29:11+5:30
भाईंदर पश्चिमेस असलेल्या चौक समुद्र किनारी भावांसोबत मासे पकडण्यासाठी गेलेला 16 वर्षाचा मुलगा समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे.

मीरा भाईंदरमध्ये मासेमारी करण्यास गेलेला 16 वर्षाचा मुलगा बुडाला
मीरारोड - भाईंदर पश्चिमेस असलेल्या चौक समुद्र किनारी भावांसोबत मासे पकडण्यासाठी गेलेला 16 वर्षाचा मुलगा समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस मात्र भरती असल्याने बुडालेल्या मुलाचा शोध घेणे अवघड झाले आहे .
सध्या मासेमारी बंद असली तरी किनाऱ्याला पाण्याच्या प्रवाहात येणारे मासे मिळत असल्याने दोन काठ्यांना जाळे लावून मच्छीमार हे मासेमारी करत असतात. घरच्या पुरते मासे यातून मिळत असतात. तर काहीजण लहान बोट घेऊन जवळपास मासेमारी करतात.
भाईंदरच्या उत्तनजवळील चौक बंदरात राहणारा ऑज्वल अजय माल्या (१६) हा आपल्या लहान भाऊ एमोस ( १४ ) व एलिस्टन (१२) यांच्यासोबत सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास मासेमारीसाठी चौक समुद्र किनारी गेला होता. दोन काठ्यांना जाळे लावून मासेमारी करत होते. 8.45 वाजण्याच्या सुमारास मासे पकडून झाल्यावर ऑज्वल व एलिस्टन पाण्यातून बाहेर येत होते. गुडघाभर पाणी असताना अचानक ऑज्वल पाण्यात पडला व दिसेनासा झाला.
त्याचा किनाऱ्यावर शोध घेण्यात आला. पालिकेचे अग्निशमन दलाचे जवानदेखील आले. पण त्यांच्याकडे बोट नसल्याने त्यांनी किनाऱ्यावर व परिसरात शोध घेतला असता तो सापडला नाही. मोटर बोटीच्या सहाय्याने काही काळ शोध घेतला. परंतु मोठी भरती असल्याने पाण्याचा प्रवाह वेगात होता. जेणे करून शोधकार्य थांबवण्यात आले. समुद्र किनाऱ्याच्या आजूबाजूच्या कोळीवाड्यांना देखील याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. सायंकाळी भरती कमी झाली की पुन्हा शोध कार्य सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले. ऑज्वल हा मच्छीमार कुटुंबातीलच असल्याने त्याला पोहता येत होते . नुकताच अकरावी उत्तीर्ण झाला होता.