उन्हाच्या काहिलीत केवळ दहा दिवसांत १५० वेळा बत्ती गुल; डोंबिवलीतील दोन लाख ग्राहकांना मनस्ताप 

By अनिकेत घमंडी | Updated: March 11, 2026 10:25 IST2026-03-11T10:23:55+5:302026-03-11T10:25:31+5:30

उन्हाचा पारा ४२ अंशावर गेलेला असतानाच डोंबिवलीमधील तांत्रिक बिघाडामुळे २ लाख वीज ग्राहकांची १ ते १० मार्च या दहा दिवसांत विविध ठिकाणी १५० वेळा बत्ती गुल झाली.

150 lights go out in just 10 days during summer; Two lakh consumers in Dombivli suffer | उन्हाच्या काहिलीत केवळ दहा दिवसांत १५० वेळा बत्ती गुल; डोंबिवलीतील दोन लाख ग्राहकांना मनस्ताप 

उन्हाच्या काहिलीत केवळ दहा दिवसांत १५० वेळा बत्ती गुल; डोंबिवलीतील दोन लाख ग्राहकांना मनस्ताप 

अनिकेत घमंडी 
लोकमत न्यूज नेटवर्क

 
डोंबिवली : उन्हाचा पारा ४२ अंशावर गेलेला असतानाच डोंबिवलीमधील तांत्रिक बिघाडामुळे २ लाख वीज ग्राहकांची १ ते १० मार्च या दहा दिवसांत विविध ठिकाणी १५० वेळा बत्ती गुल झाली. त्यात मंगळवारी कहरच झाला. गणेश मंदिर, बाजी प्रभू फिडरवर ९ वेळा वीज खंडित झाली होती. 

महावितरण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी फडके क्रॉस रस्त्यानजीक फते अली पथावर के. बी. वीरा शाळेसमोर रात्री साडेदहाच्या सुमारास ट्रान्सफॉर्मरमधून ५०० लिटर उकळत्या इंधनाच्या धारा रस्त्यावर पडल्या. रात्रीची वेळ असल्याने रहदारी कमी होती. त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी त्या भागातील हजारो ग्राहकांना दोन तास घामाच्या धारा आणि अंधारात राहावे लागले. 

महावितरणने लगेचच त्या भागातील ट्रान्सफॉर्मरचे काम सुरू केले. वाढता पारा आणि त्यात वीज समस्या आल्याने ग्राहकांचा मनस्ताप वाढला होता. दहावी, बारावीच्या आणि शालेय, महाविद्यालयीन परीक्षांचा कालावधी असताना समस्या येत असल्याने पालक चिंतित होते. डोंबिवली शहरात महावितरणच्या ३० फिडरद्वारे दोन लाख ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. त्यामध्ये दहा दिवसांत १५० वेळा वीज खंडित झाल्याने नागरिक हैराण आहेत.  

कचरागाडीची धडक :  सोमवारच्या फते अली रस्त्यावरील ट्रान्सफॉर्मरला मनपाच्या कचऱ्याच्या आरसी गाडीने धडक दिल्यामुळे बिघाड घडल्याची प्राथमिक माहिती आहे, त्याबाबत माहिती घेणे सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या ठिकाणी टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याबाबत हरकतीचे पत्र महापालिका मनपाच्या घनकचरा विभागाला देणार असून, जिथे ट्रान्सफॉर्मर तिथे कचरा नकोच, अशी महावितरणची ठोस भूमिका आहे.

फते अली रस्त्यावरील महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधून ५०० लिटर इंधन रस्त्यावर पडले ते यंत्र निकृष्ट दर्जाचे होते का, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. मार्चच्या दहा दिवसांत १५० वेळा वीज खंडित झाल्याची माहिती समोर येत आहे. हे गंभीर असून, सर्वाधिक वीज बिल भरणाऱ्या डोंबिवलीकरांनी हे का सहन करावे? वीज नियामक आयोगाकडे याबाबत दाद मागावी लागणार आहे. 
राजीव तायशेटे, 
अभ्यासक, वीज नियामक आयोग 

Web Title : भीषण गर्मी में बार-बार बिजली गुल होने से डोंबिवली परेशान

Web Summary : डोंबिवली में भीषण गर्मी के बीच बार-बार बिजली गुल होने से लोग परेशान हैं। मार्च के पहले दस दिनों में 150 बार बिजली गुल हुई, जिससे दो लाख उपभोक्ता प्रभावित हुए। ट्रांसफार्मर खराब होने से हजारों लोग घंटों तक अंधेरे में रहने को मजबूर हो गए, जिससे तापमान और परीक्षाओं के बीच और भी परेशानी हुई।

Web Title : Dombivli Grapples with Frequent Power Outages Amidst Scorching Heat

Web Summary : Dombivli residents are facing severe inconvenience due to frequent power outages. In the first ten days of March, there were 150 outages, impacting two lakh consumers. A transformer failure caused further disruption, leaving thousands without power for hours amidst rising temperatures and ongoing exams.