मीरा-भाईंदरमध्ये आचारसंहितेसाठी 13 पथकं तैनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 20:23 IST2019-10-17T19:45:05+5:302019-10-17T20:23:04+5:30
मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील आचारसंहिता भंगाच्या वाढत्या तक्रारींच्या अनुषंगाने १३ पथकं नेमण्यात आली आहेत.

मीरा-भाईंदरमध्ये आचारसंहितेसाठी 13 पथकं तैनात
मीरा रोड - मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील आचारसंहिता भंगाच्या वाढत्या तक्रारींच्या अनुषंगाने १३ पथकं नेमण्यात आली आहेत. त्यात ४ भरारी पथकं, ४ स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम व ३ व्हिडीओ सर्व्हिलन्स टीमचा समावेश आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सकाळी ८ ते रात्री ८ अशी दोन तर रात्री ८ ते सकाळी ८ अशी दोन मिळून ४ भरारी पथकं आचारसंहिता उल्लंघनाच्या कारवाईसाठी तैनात आहेत. त्यातच धर्तीवर सकाळी व रात्री अशा दोन पाळ्यां मध्ये ४ स्टॅटिक सर्व्हिलन्स टिम शहरातील प्रमुख नाक्यांवर वाहन आदींच्या तपासणीसाठी तैनात केलेली आहेत.
तर जाहीर सभा, मिरवणुका, पदयात्रा आदींचे छायाचित्रण करण्यासाठी ३ व्हिडिओ सर्व्हिलेन्स टीम नियुक्त केल्या गेल्या आहेत. निवडणुक निर्णय अधिकारी कृष्णकांत चिकुर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली ही पथकं कार्यरत असून मुख्यालयात एक पथक छायाचित्रण पाहण्यासह खर्चाचा समावेश आदी काम करत असल्याचे पाटील म्हणाले.
आचार संहिता प्रमुख म्हणून पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांची नियुक्ती केली गेली आहे. सर्व पथकांना वाहन आदी सुविधा देण्यात आली असून, प्रत्येक पथकात अधिकारी, पोलीस आदींचा समावेश असल्याचे आचार संहिता पथकांचे नोडल अधिकारी असलेले सुनील यादव म्हणाले. तक्रारी आल्यावर पथकांना घटनास्थळी रवाना केले जात असुन त्यांच्या अहवाला नंतर आवश्यक कार्यवाहीचा निर्णय घेतला जात असल्याचे ते म्हणाले.