१३ कोटींच्या मजुरीसाठी मंगळवारी हाय वे रोखणार
By Admin | Updated: April 3, 2016 03:51 IST2016-04-03T03:51:54+5:302016-04-03T03:51:54+5:30
रोजगार हमी योजनेतंर्गत काम करूनही गेल्या तीन महिन्यांपासून मजूर पगारापासून वंचित आहेत. येत्या दोन दिवसात पगार दिला

१३ कोटींच्या मजुरीसाठी मंगळवारी हाय वे रोखणार
विरार :रोजगार हमी योजनेतंर्गत काम करूनही गेल्या तीन महिन्यांपासून
मजूर पगारापासून वंचित आहेत.
येत्या दोन दिवसात पगार दिला
नाही तर ५ एप्रिलला श्रमजीवी
संघटना मुंबईकडे जाणारे सर्व महामार्ग रोखून धरणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी दिली.
१ जानेवारी २०१६ ते ३० मार्च २०१६ दरम्यान पालघर जिल्ह्यात रोजगार हमी अंतर्गत सर्व तालुक्यातील ग्रामपंचायत व यंत्रणामार्फत ९ हजार २४ कामे करण्यात आली. या कामासाठी तब्बल ७ लाख ९४ हजार ३४८ दिवस काम झाले. मजुरांची १३ कोटी ४८ लाख २८ हजार इतकी मजूरी मिळणे आवश्यक होते. मजूरांनी अनेकवेळा शासकीय कार्यालयात हेलपाटे घालूनही त्यांना मजूरी मिळाली नाही. किमान आर्थिक वर्ष संपत असताना मजूरांच्या खात्यामध्ये मजुरी येणे अपेक्षित होते. परंतू मजूरांच्या पदरी निराशाच पडली, असे पंडित यांनी सांगितले.
जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यांची मजुरी रोजगार हमी कायद्यानुसार ०.५टक्के व्याजासहित पुढील दोन दिवसात मजुरांच्या खात्यात जमा न झाल्यास ५ एप्रिल २०१६ रोजी श्रमजीवी संंघटना मुंबईकडे जाणारे सर्व महामार्ग रोखेल असा इशारा पंडित यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
आम्ही जगायचे कसे?
१) जव्हार, मोखाडा, विक्रमगड आदि अतिदुर्गम भागात आॅक्टोबर २०१५ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत पाड्यापाड्यात रोजगार हमी अंतर्गत कामाची मागणी करणारे अर्ज भरुन घेण्याचे अभियान राबवले. या अभियानानंतर कामाच्या मागणीत मागील वर्षीपेक्षा या वर्षी १० ते १५ पट जास्त वाढ झाली.
२) जव्हार तालुक्यात मागील वर्षी आॅक्टोबर ते डिसेंबर २०१४ साली कामाची मागणी १३ हजार ६६२ दिवस होती. श्रमजीवी संघटनेच्या अभियानानंतर आॅक्टोबर ते डिसेंबर २०१५ साली कामाची मागणी २ लाख २२ हजार ८६४ मनुष्य दिवस म्हणजेच मागणी २० पटीने वाढली.
३) मोखाडा तालुक्यात आॅक्टोबर ते डिसेंबर २०१४ साली कामाची मागणी २१हजार ५७१ मनुष्य दिवस व श्रमजीवीच्या अभियानानंतर कामाची मागणी ९१हजार ९८६ मनुष्य दिवस म्हणजेच कामाची मागणी ४ पटीने वाढली.
४) जिल्हा प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. परंतु आता वेतन द्यायला पैसे नाहीत. मजुरांना काम मिळाले. पण उपासमार तशीच राहिली. आधीच दारिद्र्य, कुपोषणाने ग्रासलेल्या व काम करुनही मजुरी मिळत नसल्यामुळे आदिवासी समाज जगायच कसे असा प्रश्न पंडित यांनी उपस्थित केला आहे.