जिल्ह्यात आरटीईच्या १२ हजार जागा अद्यापही रिक्त
By Admin | Updated: June 21, 2017 04:34 IST2017-06-21T04:34:51+5:302017-06-21T04:34:51+5:30
सीबीएसई, एसएससी, आयसीएसई आणि आयबी आदी बोर्डांच्या जिल्ह्यात ८११ शाळा कार्यरत आहेत. यामधील केजी, ज्यू. केजी

जिल्ह्यात आरटीईच्या १२ हजार जागा अद्यापही रिक्त
सुरेश लोखंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सीबीएसई, एसएससी, आयसीएसई आणि आयबी आदी बोर्डांच्या जिल्ह्यात ८११ शाळा कार्यरत आहेत. यामधील केजी, ज्यू. केजी आणि पहिलीच्या वर्गात गरीब मुलांना प्रवेश देण्यासाठी १६ हजार ४५५ जागा आरक्षित ठेवल्या होत्या. परंतु, पालकांनी केवळ नामांकीत शाळांची निवड करून त्यात चार हजार ४०१ प्रवेश घेतले. उर्वरित शाळा नापसंत केल्यामुळे त्यात अद्यापही १२ हजार ५४ जागा प्रवेशाअभावी रिक्त आहेत.
जिल्ह्यातील दुर्बल व वंचित घटकांच्या कुटुंबातील बालकांनादेखील इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण घेता यावे, यासाठी आरटीई अर्थात ‘शिक्षणाचा हक्क ’ या कायद्याअंतर्गत खाजगी शाळेत २५ टक्के जागा आरक्षित ठेवल्या होत्या. यानुसार ५९१ खाजगी शाळांमध्ये १२ हजार ६०५ विद्यार्थ्यांना पहिलीच्या वर्गात, तर ८९ शाळांच्या एक हजार ७९७ जागांवर ज्युनिअर केजी आणि नर्सरीकरीता १२८ शाळांमध्ये दोन हजार ५३ प्रवेश आरक्षित ठेवले होते. परंतु, पालकांनी नामांकित शाळांमध्ये सहाव्या फेरी अखेर चार हजार ४०१ विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतले. उर्वरित १२ हजार ५४ जागा यंदाही प्रवेशाअभावी रिक्त राहणार आहेत.
पहिलीच्या वर्गासह ज्युनिअर व सिनिअर केजीत प्रवेश घेण्यासाठी आठ हजार ४०९ पालकांनी अर्ज केले होते. परंतु,काही ठराविक शाळांवरच लक्ष केंद्रीत करून अर्ज दाखल केल्याचे निदर्शनात आले. शेवटचा राऊंड केवळ २१ विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला आहे.