जि.प.च्या योजनेद्वारे स्वयंसहाय्यता समुहातील १२ महिला ड्रोन पायलट!
By सुरेश लोखंडे | Updated: April 30, 2024 16:00 IST2024-04-30T16:00:31+5:302024-04-30T16:00:57+5:30
या ड्रोन पायलेट प्रशिक्षणाद्वारे रिअल इस्टेट, शेतीसाठी, पर्यावरण संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन, सर्वेक्षण आणि बांधकाम, सुरक्षा विविध क्षेत्रात महिला उत्तम कामगिरी आता करणार आहे.

जि.प.च्या योजनेद्वारे स्वयंसहाय्यता समुहातील १२ महिला ड्रोन पायलट!
ठाणे : जिल्ह्यात ग्रामपंचायत विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात येत आहे. त्यातून स्टार्टअप ठाणे ग्रामीण योजनेव्दारे उपजीविका निर्माण करणेकरिता व्यवसाय प्रशिक्षण व सुविधा या योजनेतून ठाणे जिल्हा परिषद महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील तब्बल १२ महिलांना ड्रोन पायलट प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवले आहे.
या ड्रोन पायलेट प्रशिक्षणाद्वारे रिअल इस्टेट, शेतीसाठी, पर्यावरण संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन, सर्वेक्षण आणि बांधकाम, सुरक्षा विविध क्षेत्रात महिला उत्तम कामगिरी आता करणार आहे. या प्रशिक्षणात यशस्वी ठरलेल्या महिलांना प्रमाणपत्र देऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे यांनी या प्रशिक्षित महिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषदेकडून महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्वयं सहाय्यता समूहातील महिलांना ड्रोन पायलेट प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी योजनेत सहा लाख ५२ हजारांची तरतूद करून त्यातून महिलांना तांत्रिकदृष्ट्या या ड्रोन पायलटचे प्रशिक्षण देऊन सक्षम केले. या ड्रोन पायलट प्रशिक्षणाचा लाभ शेती, आरोग्य, तसेच विविध सर्व्हेक्षण करण्यासाठी फायदा नक्कीच होईल, अशी अपेक्षा शिसोदे यांनी व्यक्त केली.
ड्रोन प्रशिक्षण घेताना तांत्रिक प्रशिक्षण सुध्दा आम्हाला उत्तमरित्या दिले, असे या प्रशिक्षणार्थी महिलांनी स्पष्ट केले. राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान योजनेअंतर्गत स्थापित स्वंय सहाय्यता समुहातील एकूण १२ महिलांना श्री श्री रुरल डेवलपमेन्ट प्रोग्राम स्किल सेंटर, कनकापुरा रोड, नेयर विविकी कॉटर्स, उदयपूरा बेंगलोर येथे ड्रोन पायलटचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.