ठाणे ग्रामीण भागातील १,१२१ कॅमेरे जोडले पोलिस नियंत्रण कक्षाशी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 14:07 IST2025-03-19T14:07:12+5:302025-03-19T14:07:22+5:30

 या उपक्रमाचे लोकार्पण कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते झाले. दररोज २४ तास हा नियंत्रण कक्ष सुरू राहणार आहे. यामध्ये पाच पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सीसीटीव्हींची पाहणी करणार आहेत.

1121 cameras in Thane rural areas linked to police control room | ठाणे ग्रामीण भागातील १,१२१ कॅमेरे जोडले पोलिस नियंत्रण कक्षाशी 

ठाणे ग्रामीण भागातील १,१२१ कॅमेरे जोडले पोलिस नियंत्रण कक्षाशी 

ठाणे : ठाणे पोलिस आयुक्तालयात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चांगले जाळे आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गुन्हेगारी, वाहतूक कोंडी आणि गटातटांतील वादावर वचक ठेवण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी ‘एक कॅमेरा आपल्या सुरक्षेसाठी’ या मोहिमेंतर्गत दुकाने, घरे, रस्त्यालगतची हॉटेल व ढाबे यांनी बसवलेल्या सीसीटीव्हीचे नियंत्रण थेट पोलिस नियंत्रण कक्षात घेतले. एक हजार १२१ सीसीटीव्हींचे नियंत्रण या कक्षातून होत आहे. येत्या कालावधीत आणखी साडेतीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे नियंत्रण कक्षासोबत जोडले जाणार आहेत.

ठाणे ग्रामीण पोलिसांनी गावागावांतील सरपंच, सराफा दुकानदार, नागरिकांची भेट घेऊन त्यांना ‘एक कॅमेरा आपल्या सुरक्षेसाठी’ या उपक्रमाची माहिती दिली.  नागरिक आणि दुकानदारांनी त्यांच्या दुकानाबाहेरील किंवा घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे हे पोलिस नियंत्रण कक्षासोबत जोडण्यास सहमती दर्शविली. पेट्रोल पंप, शाळा, उपाहारगृहे, हॉटेल येथील माहिती घेतली जात होती. आतापर्यंत एक हजार १२१ कॅमेरे नियंत्रण कक्षासोबत जोडले. 

 या उपक्रमाचे लोकार्पण कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते झाले. दररोज २४ तास हा नियंत्रण कक्ष सुरू राहणार आहे. यामध्ये पाच पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सीसीटीव्हींची पाहणी करणार आहेत.

ठाणे ग्रामीण पोलिस क्षेत्रात भिवंडी तालुका, गणेशपुरी, पडघा कल्याण तालुका, कसारा, किन्हवली, कुळगाव, मुरबाड, शहापूर, टोकवडे आणि वाशिंद पोलिस ठाणे येतात.  मुंबई-नाशिक महामार्ग, वाडा-भिवंडी रस्ता, मुरबाड असे महत्त्वाचे मार्ग ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून जातात. ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत गावपाड्यांची संख्या अधिक आहे. या भागात साडेचार हजार खासगी, सरकारी योजनेतून बसविलेले सीसीटीव्ही आहेत. या कॅमेऱ्यांमुळे जनतेला तसेच वाहतूक कोंडी, गुन्ह्यांचा तपास, महिला सुरक्षा, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवता येणार आहे. - डॉ. डी. एस. स्वामी, पोलिस अधीक्षक, ठाणे ग्रामीण

४,५०० सीसीटीव्हींची नजर राहणार -
ग्रामीण भागातील दुकाने, हॉटेल, ढाबे यांनी बसवलेल्या सीसीटीव्हींची होणार मदत 
‘एक कॅमेरा आपल्या सुरक्षेसाठी’ उपक्रमाला प्रतिसाद

Web Title: 1121 cameras in Thane rural areas linked to police control room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.