नवर्षाच्या पहिल्या दिवशीच मध्य रेल्वेवर अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू, 12 प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 11:59 IST2018-01-02T11:43:28+5:302018-01-02T11:59:31+5:30
नवीन वर्ष 2018च्या पहिल्याच दिवशी विविध कारणांमुळे 11 रेल्वे प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे तर 12 प्रवासी विविध ठिकाणी झालेल्या अपघातात जखमी झाले आहेत.

नवर्षाच्या पहिल्या दिवशीच मध्य रेल्वेवर अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू, 12 प्रवासी जखमी
अनिकेत घमंडी / डोंबिवली - नवीन वर्ष 2018च्या पहिल्याच दिवशी विविध कारणांमुळे 11 रेल्वे प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे तर 12 प्रवासी विविध ठिकाणी झालेल्या अपघातात जखमी झाले आहेत. 2017 मध्ये एकही दिवस शून्य अपघाताचा म्हणून नोंदवला गेला नव्हता, ही गंभीर बाब आहे.
सोमवारी 1 जानेवारीच्या अपघातात मृतांमध्ये 8 पुरुष प्रवासी तर 3 महिलांचा समावेश आहे, तसेच जखमींमध्ये 11 पुरुष आणि एका महिलेचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी मध्य व पश्चिम रेल्वेच्या 17 ठिकाणच्या लोहमार्ग पोलीस ठाण्यातील असून सीएसएमटी ते कर्जत, तसेच चर्चगेट ते बोरोवली, वसई रोड, पालघर आदी मार्गावर विविध ठराविक अंतरावर ती पोलीस ठाणी कार्यान्वित आहेत. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कर्जत 100 किमी, सीएसएमटी ते खोपोली 121 किमी तसेच सीएसएमटी ते कसारा 110 किमी परिसरात आणि सीएसएमटी-पनवेल अशी 10 लोहमार्ग पोलीस ठाणे मध्य रेल्वेच्या अंतर्गत येतात तर अन्य 7 पोलीस ठाणे पश्चिम रेल्वे अंतर्गत येतात.
रेल्वे प्रवासात अपघात कमी व्हावेत, प्रमाण घटवे यासाठी रेल्वे प्रशासनाने विविध उपाय केले पण त्याना यश मात्र येत नाही ही वस्तुस्थिती आहे. यामुळे प्रवाशांची सुरक्षा आणि सुखद संरक्षित सुरक्षित प्रवासाची प्रवाशांना प्रतीक्षाच असल्याचे मत प्रवासी संघटनांनी व्यक्त केले.