मीरा-भाईंदर पालिकेची १० लसीकरण केंद्रे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:05 IST2021-05-05T05:05:38+5:302021-05-05T05:05:38+5:30
मीरा रोड : लसींचा पुरवठा न झाल्याने मीरा-भाईंदर महापालिकेला त्यांची १० लसीकरण केंद्रे सोमवारी बंद करावी लागली आहेत. दोन ...

मीरा-भाईंदर पालिकेची १० लसीकरण केंद्रे बंद
मीरा रोड : लसींचा पुरवठा न झाल्याने मीरा-भाईंदर महापालिकेला त्यांची १० लसीकरण केंद्रे सोमवारी बंद करावी लागली आहेत. दोन लसीकरण केंद्रांवरच लस दिली जात असल्याने नागरिकांची नाराजी वाढली आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेकडे दुसऱ्या डोससाठी चार हजार ४४० लसी शिल्लक आहेत. त्यात कोवॅक्सिनच्या दाेन हजार १८० व कोविशिल्डच्या दाेन हजार २६० लसी आहेत. या लसी ४५ वर्षांवरील नागरिकांसाठीच्या दुसऱ्या डोससाठी लागणार आहेत. जेणेकरून पालिकेने लस येईपर्यंत भाईंदरचे भीमसेन जोशी रुग्णालय व मीरा रोडचे इंदिरा गांधी रुग्णालयातील लसीकरण केंद्रच सोमवारी सुरू ठेवले होते.
सध्या १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना जोशी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात लस दिली जात आहे. त्यासाठी एक हजार ८१० इतक्या लसींचा साठा शिल्लक असल्याने मंगळवारी केवळ ४०० लसीच दिल्या जाणार आहेत. या गटातील नागरिकांसाठी एकच केंद्र असल्याने जोशी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर गर्दी उसळत आहे. इंदिरा गांधी रुग्णालयातील केंद्रावर मंगळवारी फक्त दुसऱ्या डोसची तारीख असणाऱ्यांना लस दिली जाणार आहे. मंगळवारी लसींचा पुरवठा होईल, अशी पालिका अधिकाऱ्यांना आशा असून लस मिळताच अन्य केंद्रे सुरू केली जातील, असे सांगण्यात येत आहे. शहरातील जवळपास सर्वच लसीकरण केंद्रे बंद असल्याने लोकांमध्ये नाराजी आहे.