युकी भांबरीने नोंदवला खळबळजनक विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:28 IST2017-08-04T01:28:33+5:302017-08-04T01:28:44+5:30
भारताचा अव्वल टेनिसपटू युकी भांबरीने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना जागतिक क्रमवारीतील २२ व्या स्थानी असलेल्या गाएल मोंफिल्सला नमवून एटीपी सिटी ओपन स्पर्धेत खळबळ माजवली.

युकी भांबरीने नोंदवला खळबळजनक विजय
वॉशिंग्टन : भारताचा अव्वल टेनिसपटू युकी भांबरीने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना जागतिक क्रमवारीतील २२ व्या स्थानी असलेल्या गाएल मोंफिल्सला नमवून एटीपी सिटी ओपन स्पर्धेत खळबळ माजवली. तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना युकीने फ्रान्सच्या मोंफिल्सला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे, मोंफिल्सने गेल्या वर्षी येथे जेतेपद पटकावले होते.
स्पर्धेत सहावे मानांकन लाभलेल्या मोंफिल्सविरुद्ध एक तास ५१ मिनिटांपर्यंत रंगलेल्या रोमांचक लढतीत युकीने जबरदस्त खेळ केला. तीन सेटपर्यंतच्या या लढतीमध्ये युकीने ६-३, ४-६, ७-५ अशी शानदार बाजी मारली. याआधीही युकीने २०१४ साली चेन्नई ओपन स्पर्धेत जागतिक टेनिसचे लक्ष वेधताना विश्वक्रमवारीत १६व्या स्थानी असलेल्या फॅबियो फोगनिनी याला पराभवाचा धक्का दिला होता. परंतु, त्या वेळी इटलीच्या फॅबियोने दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडला होता. या वेळी मात्र युकीने आपली छाप पाडली. यापुढील फेरीत युकीचा सामना अर्जेंटिनाच्या गुइडो पेलाविरुद्ध होईल. पेलाने पहिल्या फेरीत भारताच्या रामकुमार रामनाथनला नमविले होते. यानंतर दुसºया फेरीत त्याने जर्मनीच्या मीशा ज्वेरेवला ६-७, ७-६, ६-३ असा धक्का दिला होता. भारताचा अनुभवी खेळाडू रोहन बोपन्नाने अमेरिकन जोडीदार डोनाल्ड यंगसह खेळताना दुसºया फेरीत प्रवेश केला. बोपन्ना-यंग यांनी डॅनियल नेस्टर (कॅनडा) आणि एसाम उल हक कुरेशी (पाकिस्तान) या जोडीला ६-२, ६-३ असे नमविले. (वृत्तसंस्था)
हा अविश्वसनीय विजय आहे. मी प्रत्येक गुण मिळवण्यासाठी संघर्ष केला आणि माझी सर्व्हिस कायम राखण्यावर भर दिला. आक्रमक पवित्रा राखून खेळताना मी मिळालेल्या संधीचा फायदा उठवला.
- युकी भांबरी
एटीपी विश्व टूर स्पर्धेत दुसºयांदा युकीने मुख्य स्पर्धेत सलग दोन विजयांची नोंद केली. याआधी त्याने २०१४ साली चेन्नई ओपन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. तसेच, २०१५ साली सप्टेंबर महिन्यात युकीने जागतिक क्रमवारीत अव्वल ५० स्थानांमध्ये असलेल्या झेक प्रजासत्ताकच्या जिरी वेस्ली याला हरविले होते.