यूएस ओपन : फेडररची झुंजार सलामी, १९ वर्षीय टायफोने दिली कडवी टक्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:32 IST2017-08-31T00:31:56+5:302017-08-31T00:32:52+5:30
यंदाच्या विम्बल्डनमध्ये एकही सेट न गमावता विक्रमी आठव्यांदा जेतेपद पटकावलेल्या लिजंड रॉजर फेडररला यूएस ओपनच्या पहिल्याच फेरीत ५ सेटपर्यंत झुंजावे लागले.

यूएस ओपन : फेडररची झुंजार सलामी, १९ वर्षीय टायफोने दिली कडवी टक्कर
न्यूयॉर्क : यंदाच्या विम्बल्डनमध्ये एकही सेट न गमावता विक्रमी आठव्यांदा जेतेपद पटकावलेल्या लिजंड रॉजर फेडररला यूएस ओपनच्या पहिल्याच फेरीत ५ सेटपर्यंत झुंजावे लागले. अमेरिकेचा १९ वर्षीय बिगरमानांकीत फ्रान्सिस टायफो याने बलाढ्य फेडररला झुंजवले. त्याचवेळी, स्पेनच्या राफेल नदालने सहज विजयी सलामी देत तीन सेटमध्ये बाजी मारली.
स्वित्झर्लंडच्या फेडररने २ तास ३८ मिनीटांपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात विजय खेचून आणला. पहिला सेट गमावून पिछाडीवर पडल्यानंतर फेडररने सलग दोन सेट जिंकत पुनरागमन केले. चौथ्या सेटमध्ये बाजी मारत टायफोने सामना अंतिम पाचव्या सेटमध्ये नेला.
यावेळी, फेडररने आपला सर्व अनुभव पणास लावताना ४-६, ६-२, ६-१, १-६, ६-४ असा विजय मिळवला. यंदा आॅस्टेÑलियन
व विम्बल्डन विजेतेपद पटकावलेला फेडरर आपल्या २०व्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी प्रयत्नशील आहे.
दुसरीकडे, नदालने सहज विजयी सलामी देताना सर्बियाच्या डूसैन लैजोविक याला ७-६(६), ६-२, ६-२ असे नमविले. पहिला सेट टायब्रेकमध्ये जिंकल्यानंतर नदालने आक्रमक खेळ करताना युवा लैजोविकला फारशी संधी दिली नाही. (वृत्तसंस्था)
महिलांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाने विजयी सलामी देत झेक प्रजासत्ताकच्या कॅटरिना सिनियाकोवा हिला
६-०, ६-७(५-७), ६-३ असे नमवले. पुरुषांमध्ये सहाव्या मानांकीत आॅस्ट्रियाच्या डॉमनिक थिएम याने आॅस्टेÑलियाच्या अॅलेक्स डी मायनॉर याचा ६-४, ६-१, ६-१ असा धुव्वा उडवला. तसेच, अर्जेंटिनाच्या लिओनार्डो मेयर याने अनपेक्षित विजय नोंदवताना फ्रान्सच्या २६व्या मानांकीत रिचर्ड गास्केत याला ३-६, ६-२, ६-४, ६-२ असा धक्का दिला.