सिंधूचा अनपेक्षित पराभव, भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:50 IST2017-11-18T00:50:08+5:302017-11-18T00:50:18+5:30
सायना नेहवाल आणि एच. एस. प्रणॉय यांच्या पराभवानंतर चायना सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पदकाच्या आशा गतविजेत्या पी. व्ही. सिंधू हिच्यावर होत्या.

सिंधूचा अनपेक्षित पराभव, भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात
फुजोऊ : सायना नेहवाल आणि एच. एस. प्रणॉय यांच्या पराभवानंतर चायना सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पदकाच्या आशा गतविजेत्या पी. व्ही. सिंधू हिच्यावर होत्या. परंतु, उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या गाओ फांगजेईविरुद्ध सरळ दोन गेममध्ये सिंधू पराभूत झाल्याने भारताला मोठा धक्का बसला.
केवळ ३८ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात सिंधू आपल्य लौकिकानुसार खेळ करु शकली नाही. १९वर्षीय फांगजेईने जबरदस्त खेळ करताना जागतिक क्रमवारीत दुसºया स्थानी असलेल्या सिंधूला एकतर्फी झालेल्या सामन्यात २१-११, २१-१० असे सहजपणे नमवले. या अनपेक्षित पराभवानंतर स्पर्धेतील भारताचे आव्हानही संपुष्टात आले आहे.
रिओ आॅलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावलेली सिंधू गेल्या तीन आठवड्यांपासून सलगपणे खेळत असून तिने डेन्मार्क ओपन, फ्रेंच ओपन या स्पर्धांनंतर नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. चीनची युवा फांगजेईविरुद्ध खेळताना सिंधू खूप थकल्यासारखी जाणवली. तसेच, अनेकदा सिंधू झुंजताना दिसली. फांगजेईने जबरदस्त वर्चस्व राखताना दीर्घ रॅलीज खेळताना विविध फटके मारत सिंधूचा पाडाव केला.
आता, सिंधू पुढील आठवड्यामध्ये हाँगकाँग ओपन स्पर्धेत खेळेल. गेल्यावर्षी या स्पर्धेत सिंधू अंतिम फेरीत पोहचली होती. (वृत्तसंस्था)