पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 05:29 IST2025-07-13T05:29:08+5:302025-07-13T05:29:18+5:30
उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या आर्यना सबालेंकाला धक्का देणारी २३ वर्षीय अनिसिमोव्हा तिच्या कारकिर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम फायनलमध्ये पूर्णपणे निष्प्रभ ठरली.

पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
लंडन : पोलंडच्या आठव्या मानांकीत इगा स्वियातेकने अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोव्हावर अवघ्या ५७ मिनिटांत ६-०, ६-० अशी एकतर्फी मात करत विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. तिचे हे पहिलेच विम्बल्डन ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. तर एकूण हे तिचे सहावे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.
उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या आर्यना सबालेंकाला धक्का देणारी २३ वर्षीय अनिसिमोव्हा तिच्या कारकिर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम फायनलमध्ये पूर्णपणे निष्प्रभ ठरली. तर स्वियातेकने दर्जेदार कामगिरी केली. तिच्या आक्रमक फटक्यांसमोर अनिसिमोव्हा पूर्णपणे निरुत्तर पाहायला मिळाली. स्वियातेकने याआधी फ्रेंच ओपनमध्ये चार आणि अमेरिकन ओपनमध्ये एक विजेतेपद पटकावले आहे. हिरवळीच्या कोर्टवर ती एकही विजेतेपद जिंकू शकली नव्हती. विम्बल्डनचे विजेतेपद पटकावणारी स्वियातेक ही पोलंडची पहिली महिला खेळाडू ठरली.
११४ वर्षांनी घडला इतिहास
इगा स्वियातेकने अनिसिमोव्हावर सरळ सेटमध्ये विजय मिळवताना तिला एकही गेम जिंकू दिली नाही. ११४ वर्षांनंतर एखाद्या खेळाडूने असा एकतर्फी विजय मिळवला आहे.
याआधी १९११मध्ये असा एकतर्फी सामना झाला होता. ओपन युगात विम्बल्डनमधील एखाद्या खेळाडूचा हा पहिलाच डबल बॅगल विजय आहे. १९८८च्या फ्रेंच ओपन अंतिम फेरीत स्टेफी ग्राफने नताशा झ्वेरेवाला अशाच फरकाने पराभूत केले होते.