Pakistan's eruption from India; Leander celebrated a record 7th win in doubles | भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा; लिअँडरने दुहेरीत साजरा केला विक्रमी ४४वा विजय
भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा; लिअँडरने दुहेरीत साजरा केला विक्रमी ४४वा विजय

नूर सुल्तान : अनुभवी स्टार खेळाडू लिअँडर पेस याने स्वत:चा डेव्हिस चषक रेकॉर्ड सुधारताना जीवन नेदुनचेझियनसोबत शनिवारी दुहेरीत ४४ वा विक्रमी विजय नोंदविला. या बळावर भारताने पाकिस्तानचा ४-० ने पराभव करीत २०२० च्या विश्व गटाची पात्रता गाठली आहे.
पाकिस्तानचे मोहम्मद शोएब आणि हुफैजा अब्दुल रहमान यांची जोडी पेस-जीवन जोडीचा सामना करू शकली नाही. भारताच्या जोडीने केवळ ५३ मिनिटात ६-१, ६-३ ने विजय नोंदविला. पेसने मागच्या वर्षी ४३ वा दुहेरी सामना जिंकून डेव्हिस चषकाच्या इतिहासात सर्वांत यशस्वी खेळाडू म्हणून इटलीच्या निकोला याला मागे टाकले होते. पेसने ५६ पैकी ४३ आणि निकोलाने ६६ पैकी ४२ सामने जिंकले आहेत.
पेसचा ४४ विजयांचा रेकॉर्ड मोडीत निघेल असे वाटत नाही. सध्याचा कुणीही खेळाडू आघाडीच्या दहा खेळाडूंमध्ये नाही. बेलारुसचा मॅक्स मिर्नयी तिसऱ्या स्थानी असून त्याच्या नावे ३६ विजयाची नोंद आहे. पेस दुहेरीत सर्वाधिक विजय नोंदविण्यात पहिल्या स्थानावर असला तरी एकूण विजयात पाचव्या स्थानी आहे. त्याने एकेरी(४८ विजय) तसेच दुहेरीत ९२ सामने जिंकले असून ३५ सामने गमावले आहेत.
परतीच्या एकेरीत सुमित नागल याने युसूफ खलील याचा ६-१,६-० ने पराभव केला. यानंतर उभय संघांनी अर्थहीन पाचवी लढत न खेळण्याचा निर्णय घेतला.
भारताने फेब्रुवारी २०१४ नंतर पहिल्यांदा कुठल्याही लढतीत सर्व सामने जिंकले. त्यावेळी इंदूरमध्ये चायनीज तायपेईचा ५-० ने पराभव केला होता.
भारताची क्रोएशियाविरुद्ध पात्रता लढत आता ६ आणि ७ मार्च रोजी खेळली जाईल. डेव्हिस चषक फायनल्सच्या १२ पात्रता स्थानांसाठी २४ संघ एकमेकांविरुद्ध खेळणार असून पराभूत होणारे १२ संघ २०२० मध्ये विश्व ग्रूप-१ मध्ये खेळतील. विजेते संघ फायनल्समध्ये खेळणार असून कॅनडा, ब्रिटन, रशिया, फ्रान्स आणि सर्बिया हे संघ आधीच पात्र ठरले आहेत. (वृत्तसंस्था)

विजय जवानांना समर्पित
भारताचा बिगर खेळाडू कर्णधार रोहित राजपाल याने हा विजय भारतीय सैन्याला समर्पित केला आहे. महेश भूपतीऐवजी कर्णधार म्हणून नियुक्ती झालेला राजपाल म्हणाला, ‘आमच्या कुटुंबीयांचे संरक्षण करीत सीमेवर लढणाºया जवानांना हा विजय समर्पित करतो.’

हा माझा ४४ वा विजय असला तरी पहिल्या विजयासारखाच वाटतो. माझे सर्व विजय ‘विशेष’ आहेत. विक्रमांच्या यादीत भारताला स्थान मिळवून देण्याची धडपड असून, जीवन माझ्यासोबत पहिला सामना खेळत होता. सीनियर या नात्याने सर्व जबाबदारी मी स्वत:च्या खांद्यावर घेतली. जीवनसारखा खेळाडू मला ताजातवाना आणि उत्साहवर्धक ठेवतो. त्याच्यासोबत खेळून सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा विश्वास संचारतो.
- लिअँडर पेस

Web Title: Pakistan's eruption from India; Leander celebrated a record 7th win in doubles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.