#BestOf2017 : युवा खेळाडूंनी दाखवली आशा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 02:49 AM2017-12-25T02:49:45+5:302017-12-27T18:55:03+5:30

सरत्या वर्षामध्ये भारतीय टेनिसपटूंनी लक्षवेधी कामगिरी करत आपली छाप पाडली. भारताच्या युवा खेळाड़ूंनी काही बलाढ्य खेळाडूंना पराभवाचा धक्का देत टेनिसविश्वात खळबळ माजवली.

The Best of 2017: Youth Players Show | #BestOf2017 : युवा खेळाडूंनी दाखवली आशा

#BestOf2017 : युवा खेळाडूंनी दाखवली आशा

Next

नवी दिल्ली : सरत्या वर्षामध्ये भारतीय टेनिसपटूंनी लक्षवेधी कामगिरी करत आपली छाप पाडली. भारताच्या युवा खेळाड़ूंनी काही बलाढ्य खेळाडूंना पराभवाचा धक्का देत टेनिसविश्वात खळबळ माजवली. त्याचवेळी दुसरीकडे अनुभवी रोहन बोपन्ना याने ग्रॅण्ड स्लॅम आपल्या नावे केला. परंतु, महिला गटात स्टार खेळाडू सानिया मिर्झाची मात्र अव्वल स्थानावरून घसरण सुरू झाली.
त्यामुळेच भारतीय टेनिससाठी हे वर्ष काहीसे संंमिश्र राहिले, असेच म्हणावे लागेल. कारण यंदा कोणीही मोठे शिखर सर केलेले नाही किंवा कोणीही एकदम रसातळाला पोहोचलेले नाही. युवा खेळाडूंनी आपल्या जोरावर आशा कायम ठेवल्या आहेत.
युकी भांबरी, रामकुमार रामनाथन आणि सुमित नागल यांनी गेल्या वर्षात यश मिळवले. त्यांनी आपल्या क्षमतेचा योग्य वापर केला, आणि सलग चांगले खेळ केले. मात्र क्रीडा प्रशासकांचे समर्थन आणि कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर पडली नाही.
पूर्ण सत्रात भारतात फक्त दोन चॅलेंजर स्पर्धा पुणे आणि बंगळुरू येथे खेळवण्यात आल्या. युकी याने पुण्यात चॅलेंजर स्पर्धा जिंकली तर नागर याने बंगळुरूत विजय मिळवला. यामुळे दोन्ही खेळाडूंच्या रँकिंगमध्ये खूपच सुधारणा झाली.
भारतातील पुरुषांच्या फक्त ९ फ्युचर्स आयटीएफ टुर्नामेंट आणि महिलांच्या सहा टुर्नामेंट खेळवण्यात आल्या. खेळाडूंच्या गरजांबाबत ‘एआयटीए’ गप्प राहिली. पैसा गोळा करण्यासाठी त्यांनी क्रीडा मंत्रालयात काही बैठका घेण्याव्यतिरिक्त फारसे काही केले नाही. मात्र मंत्रालयाने पैसा गोळा करणे ही एआयटीएची जबाबदारी असल्याचे सांगत हात झटकले.

रोहन बोपन्ना याने कॅनडाच्या गॅब्रिएल डोबरावस्कीच्या साथीने फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले. त्यासोबतच तो ग्रॅण्डस्लॅम जिंकणारा चौथा भारतीय खेळाडू बनला. दुहेरीच्या रँकिंगमध्ये तो सलग अव्वल २० मध्ये राहिला. त्याने तीन एटीपी विजेतेपद पटकावले. त्यात मॉँटो कार्लो मास्टर्सचादेखील समावेश होता. दिवीज शरण याने पुरव राजासोबतची जोडी तुटल्यावरही एटीपी युरोपियन ओपन आणि चॅलेंजर सर्किटमध्ये दोन विजेतेपद पटकावले.

तरीही युवा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले प्रदर्शन केले. युकी भांबरी याने अमेरिकेत एटीपी सिटी ओपनमध्ये जगातील २२ व्या क्रमांकाच्या गोएल मेफिल्स याला पराभूत करून जागतिक टेनिस लक्ष वेधले. दुसरीकडे, रामकुमार याने आठव्या क्रमाकांच्या डॉमनिक थिएम याला तुर्कीतील अंताल्या ओपनमध्ये पराभूत करत खळबळ माजवली.
गेल्या दोन वर्षांत शानदार खेळ करणाºया सानिया मिर्झा हिने यंदा अव्वल रँकिंग गमावले. हिंगीसनंतर सानियाला एकही चांगला जोडीदार मिळालेला नाही. शुआई पेंगसोबत ती अमेरिकन ओपन उपांत्य फेरीत पोहोचली होती.

लिएंडर पेस याने या वर्षी सलग दोन चॅलेंजर विजेतेपद पटकावले. नवे डेव्हिस कर्णधार महेश भूपती याने एप्रिलमध्ये उजबेकिस्तान विरोधात बंगळुरूत झालेल्या सामन्यात त्याला संघात सहभागी केले नव्हते. पेसला डेव्हिस कप इतिहासात सर्वात जास्त दुहेरी सामने जिंकणारा खेळाडू बनण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. आता २०१८ मध्ये तो निकोला पीट्रांजेली याचा विक्रम तोडू शकतो की नाही हे पाहणे रंजक ठरेल.

१पुण्यातील अंतिम लढत रामकुमार व युकीत झाली. मात्र एआयटीए किमान पाच चॅलेंजर स्पर्धा खेळवण्यात अपयशी ठरली आहे. भारतात टेनिससाठी पैसे गोळा करणे कठीण आहेत. मात्र एमएसएलटीए सलग कॉर्पोरेट आणि सरकारच्या साहाय्याने याचे आयोजन करत आहे.
२ एमएसएसटीएने महिलांसाठी सहा स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्यात एक डब्ल्यूटीए स्पर्धेचाही समावेश आहे. त्यासोबतच पुरुष चॅलेंजर व फेब्रुवारीतील डेव्हिस कप सामना झाला. याच महिन्यात पुण्यामध्ये एटीपीची स्पर्धासुद्धा होणार आहे.
 

Web Title: The Best of 2017: Youth Players Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.