Australian Open: Rafael Nadal in Second Round | ऑस्ट्रेलियन ओपन : राफेल नदाल दुसऱ्या फेरीत; मारिया शारापोव्हा पराभूत

ऑस्ट्रेलियन ओपन : राफेल नदाल दुसऱ्या फेरीत; मारिया शारापोव्हा पराभूत

मेलबोर्न - जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू राफेल नदालने एकतर्फी लढतीत बोलिव्हियाच्या हुजो डेलियेनचा पराभव करीत ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुस-या फेरीत प्रवेश केला. दरम्यान, पाचवेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन रशियाची स्टार खेळाडू मारिया शारापोव्हा पराभूत झाली.

नदालने सलामीच्या लढतीत ६-२, ६-३, ६-० असा सहज विजय मिळवला. तीन वेगवेगळ्या दशकांत जागतिक क्रमवारील अव्वल स्थान भूषविणाºया नदालची नजर २० व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर आहे. त्याचसोबत तो ओपन युगात किमान दोनवेळा सर्व चारही ग्रँडस्लॅम जिंकणारा खेळाडू ठरण्याच्या प्रयत्नात आहे. या विजयानंतर नदाल म्हणाला, ‘ही सकारात्मक सुरुवात आहे. पहिल्या फेरीत सरळ सेट््समध्ये विजय नोंदविणे चांगले आहे.’ आता नदालची लढत अर्जेंटिनाच्या फेडरिको डेलबोनिस किंवा पोर्तुगालच्या जोओ साऊसा यांच्यापैकी एकासोबत होईल. फेडरर आणि गत चॅम्पियन नोव्हाक जोकोव्हिच यांनीही दुसरी फेरी गाठली आहे.

दुसरीकडे शारापोव्हाला पहिल्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला आहे. जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू शारापोव्हाला क्रोएशियाच्या १९ व्या मानांकित डोन्ना वेकिचविरुद्ध ६-३, ६-४ असा पराभव स्वीकारावा लागला. २००८ ची चॅम्पियन असलेल्या शारापोव्हाला विशेष प्रवेशिकेद्वारे स्पर्धेत स्थान मिळाले होते. बंदी असलेल्या पदार्थाच्या सेवनप्रकरणी झालेल्या निलंबनाच्या शिक्षेनंतर कोर्टवर परतलेल्या शारापोव्हाला फॉर्म व फिटनेससाठी संघर्ष करावा लागत आहे. गेल्या वर्षी खांद्याच्या दुखापतीमुळे ती अनेक
स्पर्धांना मुकली. ती सलग तीन ग्रँडस्लॅममध्ये पहिल्याच फेरीत पराभूत झाली.

अन्य लढतीत ब्रिटनची जोहाना कोंटाला पहिल्या फेरीत ट्युनेशियाच्या बिगरमानांकित ओंस जाबेऊरने ६-४, ६-२ असे सरळ तीन सेटमध्ये सहजपणे पराभूत केले. तसेच, इटलीच्या १८ वर्षीय जानिक सिनेरनेही दमदार विजय मिळवताना आॅस्ट्रेलियाच्या मॅक्स परसेलचा ७-६, ६-२, ६-४ असा पराभव केला. (वृत्तसंस्था)

प्रजनेश पहिल्याच फेरीत गारद
भारताचा अव्वल टेनिसपटू प्रजनेश गुणेश्वरनला पुरुष एकेरीत पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्याने जागतिक क्रमवारीत दुस-या क्रमांकाचा खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचविरुद्ध खेळण्याची संधी गमावली.

जागतिक क्रमवारीत १२२ व्या स्थानी असलेला प्रजनेश पात्रता फेरीतून ‘लकी लुजर’ म्हणून मुख्य फेरीत दाखल झाला. त्याला पहिल्या फेरीत जपानच्या तत्सुमा इतोविरुद्ध २ तास रंगलेल्या लढतीत ४-६, २-६, ५-७ असा पराभव पत्करावा लागला. इतोला आता सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.

प्रजनेश म्हणाला, ‘इतोला नमवता आले असते. माझ्यासाठी हा चांगला ड्रॉ होता. मी याआधी तीन सामने आणखी खेळलो होतो. माझी तयारी चांगली होती, पण दडपण झुगारता आले नाही. शांतचित्ताने खेळता न आल्याचा परिणाम माझ्या खेळावर झाला. त्याने चांगला खेळ केला व विजयासाठी आवश्यक असलेले सर्वकाही त्याने केले.’

Web Title: Australian Open: Rafael Nadal in Second Round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.