ऑस्ट्रेलियन ओपन : जोकोविच नवव्यांदा अजिंक्य; अंतिम लढतीत मेदवेदेववर मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 06:57 IST2021-02-22T02:20:02+5:302021-02-22T06:57:53+5:30
Australian Open Winner:ऑस्ट्रेलियन ओपन : अंतिम लढतीत मेदवेदेववर मात

ऑस्ट्रेलियन ओपन : जोकोविच नवव्यांदा अजिंक्य; अंतिम लढतीत मेदवेदेववर मात
मेलबोर्न : जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानावर असलेल्या नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनटेनिस स्पर्धेत आपले वर्चस्व कायम राखताना रविवारी पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत दानिल मेदवेदेवचा पराभव केला आणि नवव्यांदा जेतेपदाचा मान मिळविला.
जोकोविचने याचसोबत १८ वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावीत रॉजर फेडरर व राफेल नदाल यांच्या पुरुष एकेरीतील विक्रमी २० ग्रँडस्लॅम जेतेपदाची बरोबरी करण्याच्या दिशेने वाटचाल केली.
जोकोविचने भेदक सर्व्हिस व रिटर्न याव्यतिरिक्त बेसलाईनवर वर्चस्व गाजविताना मेदवेदेवचा ७-५, ६-२, ६-२ ने पराभव करीत मेलबोर्न पार्कवर सलग तिसऱ्यांदा जेतेपद पटकाविले. त्याने एकवेळ १३ पैकी ११ गेम जिंकले होते. यावरून या लढतीत त्याच्या वर्चस्वाची कल्पना येते.
सर्बियाच्या ३३ वर्षीय जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनल व फायनलमध्ये आपले सर्व १८ सामने जिंकले आहेत. जोकोविचने गेल्या १० पैकी ६ प्रतिष्ठेच्या स्पर्धांत जेतेपद पटकाविले आहे. त्यामुळे तो किमान ८ मार्चपर्यंत जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानावर राहणार असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे तो ३११ आठवडे अव्वलस्थानावर राहील आणि फेडररचा विक्रम मोडेल.
जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावरील खेळाडू मेदवेदेव आपल्या कारकिर्दीतील दुसऱ्या ग्रँडस्लॅम फायनलमध्ये खेळत होता. यापूर्वी २०१९ अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये त्याला नदालविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्याला अद्याप पहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जोकोविचने या निकालासह रशियाच्या २५ वर्षीय खेळाडूंची सलग २० विजयाची मालिका खंडित केली. मेदवेदेवने जागतिक क्रमवारीतील अव्वल १० खेळाडूंविरुद्ध गेल्या १२ लढतींमध्ये विजय मिळविला आहे. पण ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जोकोविचच्या आव्हानाला सामोेरे जाणे कुठल्याही प्रतिस्पर्ध्यासाठी सोपे नसते.दुसऱ्या सेटपर्यंतच जोकोविचच्या वर्चस्वामुळे मेदवेदेव निराश झाला होता. तो वारंवार हात उंचावत आपल्या प्रशिक्षकाकडे बघत होता.
या स्टेडियममध्ये स्पर्धेदरम्यान ग्रँडस्लॅम चॅम्पियन फेडरर, नदाल, अँडीमरे, स्टेन वावरिंका, डोमिनिक थीम यांनाही अशाप्रकारच्या निराशेला सामोरे जावे लागले आहे. त्यांना जोकोविचने मेलबोर्नमध्ये उपांत्य किंवा अंतिम फेरीत पराभूत केले आहे. जोकोविचने ऑस्ट्रेलियात ९ ग्रँडस्लॅम विजेतेपदाव्यतिरिक्त पाच विम्बल्डन, तीन अमेरिकन ओपन आणि एक फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकाविले आहे. जोकोविचकडे नदाल व फेडरर यांना पिछाडीवर सोडण्याची चांगली संधी आहे.
पोलासे, डोडिंग यांना पुरुष दुहेरीचे विजेतेपद
फिलीप पोलासेक आणि इवान डोडिंग या नवव्या मानांकित जोडीने रविवारी येथे गेल्या वेळचा विजेता राजीव राम आणि जो सेलिसबरी यांना सरळ सेटमध्ये पराभव करीत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे.स्लोवाकियाच्या पोलासेक आणि क्रोएशियाच्या डोडिंगने अमेरिकेच्या राजीव राम आणि ब्रिटनच्या सॅलिसबरी या पाचव्या मानांकन प्राप्त जोडीला एक तास २८ मिनिटांपर्यंत चाललेल्या सामन्यात ६-३, ६-४ ने पराभव केला.
अमेरिकेच्या ३६ वर्षांच्या राजीव राम याचे या पराभवानंतर दुहेरी विजेतेपद पटकावण्याचे स्वप्नदेखील भंगले आहे. त्याने शनिवारी बारबोरा क्रेजिसिकोवासोबत मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले होते. या सहाव्या मानांकन प्राप्त जोडीने अंतिम सामन्यात मॅथ्यु इबडेन आणि सामंता स्टोसुर यांना पराभूत केले होते.पोलासेक याने हा विजय त्याच्या नवजात मुलीला समर्पित केला आहे. राजीव राम याने नवव्या गेममध्ये सर्विस करताना चॅम्पियनशीप पॉइंट वाचवला. मात्र पोलासेकने पुढच्या गेममध्ये विजेतेपद पटकावले.