एटीपी फायनल्स टेनिस: थिएम-सिटसिपास जेतेपदासाठी भिडणार; गतविजेता झ्वेरेव गारद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 01:08 IST2019-11-18T01:08:13+5:302019-11-18T01:08:21+5:30
दोन्ही खेळाडूंकडे पहिल्या जेतेपदाची संधी

एटीपी फायनल्स टेनिस: थिएम-सिटसिपास जेतेपदासाठी भिडणार; गतविजेता झ्वेरेव गारद
लंडन : डॉमनिक थिएमने पुन्हा एकदा अनपेक्षित निकालाची नोंद करत गतविजेत्या अलेक्झांडर झ्वेरेवचा पराभव केला आणि एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जेतेपदासाठी तो स्टेफानोस सिटसिपासविरुद्ध भिडेल. सिटसिपासनेही धक्कादायक निकाल लावताना दिग्गज रॉजर फेडरर याला पराभूत करत अंतिम फेरी गाठली.
शनिवारी रात्री आॅस्ट्रियाच्या थिएमने सरळ दोन सेटमध्ये बाजी मारत जर्मनीच्या झ्वेरेवला ७-५, ६-३ असा धक्का दिला. यासह थिएमने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली. विशेष म्हणजे, थिएम चौथ्यांदा एटीपी फायनल्स स्पर्धा खेळतोय आणि गेल्या तीन सत्रांत तो केवळ तीन सामने जिंकू शकला. यामुळे कधीही त्याला साखळी फेरीतून आगेकूच करता आली नव्हती. यंदा मात्र त्याने मोठी सुधारणा करताना सलामीला फेडररला नमविण्याचा पराक्रम केला होता. तसेच उपांत्य फेरीत संभाव्य विजेत्या झ्वेरेवला नमविल्याने आता त्याच्या पहिल्या जेतेपदाच्या आशा अधिक उंचावल्या आहेत.
दुसरीकडे, सिटसिपासने शानदार खेळ करत फेडररला ६-३, ६-४ असे नमवत पहिल्याच प्रयत्नात स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. सिटसिपास फेडररहून १७ वर्षे वयाने लहान असून त्याच्या विजयामुळे फेडररच्या सातव्या एटीपी फायनल्स जेतेपदाचे स्वप्न भंगले. (वृत्तसंस्था)