नवी दिल्ली : भारताच्या अंकिता रैना हिने लुआन येथे युडिस वोंग चोंग हिचे कडवे आव्हान मोडीत काढताना शुक्रवारी ६०,००० डॉलर बक्षीस रकमेच्या आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेच्या एकेरीत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.द्वितीय मानांकित अंकिता रैना हिने एक सेटने मागे पडल्यानंतर जोरदार मुसंडी मारत दोन तास चाललेल्या उपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँच्या युडिस वोंग चोंग हिचा २-६, ६-४, ७-५ असा पराभव केला. रोमहर्षक ठरलेल्या या लढतीत अंकिताने ८८ गुण मिळवले जे, युडिसपेक्षा दोनने जास्त होते. या लढतीदरम्यान या दोघींनी सात वेळेस एकमेकींची सर्व्हिस भेदली. आता अंकिता उपांत्य फेरीत चीनच्या सातव्या मानांकित शुयुये मा हिच्याविरुद्ध खेळेल.अंकिता म्हणाली, ‘हा चुरशीचा सामना होता. विजय मिळविल्याने मी आनंदित आहे. पहिल्या सेटमध्ये तिने चांगली सुरुवात केली; परंतु मी पुनरागमन केले. मी सामन्याचा आनंद लुटला व दुसऱ्या व तिसºया सेटमध्ये नियंत्रण ठेवले होते.’ अंकिताजवळ आता या हंगामात तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याची संधी असेल.
आयटीएफ टेनिस स्पर्धेत अंकिता उपांत्य फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 03:27 IST