अमेरिकन ओपन: ‘बिग फोर’ जेतेपदासाठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 06:52 IST2018-08-22T05:34:10+5:302018-08-22T06:52:52+5:30
सेरेना २४ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या प्रयत्नात

अमेरिकन ओपन: ‘बिग फोर’ जेतेपदासाठी सज्ज
न्यूयॉर्क : विक्रमी कामगिरी करणाऱ्या नोव्हाक जोकोविचचे लक्ष अमेरिकन ओपन विजेतेपदावर असेल. त्याचप्रमाणे गत वर्षी विम्बल्डननंतर प्रथमच टेनिसचे ‘बिग फोर’ ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत दिसणार आहेत.
रविवारी सिनसिनाटी अंतिम सामन्यात रॉजर फेडररला नमवून जोकोविच सर्वच ९ मास्टर्स विजेतेपद पटकावणारा एकमेव टेनिसपटू ठरला आहे. जुलैमध्ये चौथ्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद जिंकणाºया जोकोविचचे लक्ष आता यूएस विजेतेपदाकडे आहे. येथे २०११ व २०१५ मध्ये विजेतेपद पटकावणारा जोकोविच पाचवेळा उपविजेताही ठरला. गतवर्षी हाताच्या दुखापतीमुळे तो खेळला नव्हता.
फ्रेंच ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यानंतर तो विम्बल्डनमध्ये खेळणार नाही, असे चित्र होते; परंतु तीन महिन्यांनंतर तो पुन्हा जुन्या लयीत आला. विम्बल्डन पटकावून त्याने १३वे ग्रँडस्लॅम जिंकले. जागतिक क्रमवारीतील अव्वल नदाल येथे गतविजेता म्हणून खेळेल. एका आठवड्याआधी टोरँटोत विजेतेपद पटकावल्यानंतर तो सिनसिनाटीत खेळला नाही. दुसरीकडे २० ग्रँडस्लॅम विजेता स्वितझर्लंडच्या रॉजर फेडररने २००८ मध्ये अखेरचे अमेरिकन ओपन विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर फेडररला येथे बाजी मारण्यात यश आलेले नाही.
सेरेनाचा विक्रमी निर्धार
टेनिस आणि कुटुंब यांच्यात ताळमेळ बसवण्याविषयी समस्येचा सामना करणाºया सेरेना विलियम्स हिचा अमेरिकन ओपनद्वारे विक्रमी २४ वे ग्रँडस्लॅम जिंकून यावर्षी निवृत्ती घेण्याचा इरादा असेल. सेरेनाच्या २३ ग्रँडस्लॅम विजेतेपदात सहा अमेरिकन ओपनचा समावेश आहे.
आणखी एक विजेतेपद पटकावून ती आॅस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक वैयक्तिक विक्रमाची बरोबरी करील.