‘मुंबई ओपन’ नोव्हेंबरमध्ये होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 12:58 IST2017-07-26T03:11:21+5:302017-07-28T12:58:47+5:30
पाच वर्षांनंतर प्रथम भारत पहिल्या डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेचे आयोजन करणार आहे. मुंबईत नोव्हेंबरमध्ये १२५ हजार डॉलर बक्षिसाची स्पर्धा खेळविण्यात येईल.

‘मुंबई ओपन’ नोव्हेंबरमध्ये होणार
नवी दिल्ली : पाच वर्षांनंतर प्रथम भारत पहिल्या डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेचे आयोजन करणार आहे. मुंबईत नोव्हेंबरमध्ये १२५ हजार डॉलर बक्षिसाची स्पर्धा खेळविण्यात येईल. ज्यात देशातील खेळाडूंना जगातील अव्वल ५० टेनिसपटूंविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघाने (एमएसएलटीए) ही स्पर्धा आयोजिण्याची जबाबदारी घेतली आहे. विशेष म्हणजे, एमएसएलटीएने नुकतेच एटीपी विश्व टूर टुर्नामेंट ‘चेन्नई ओपन’ स्पर्धेचे आयोजन करण्याचे अधिकारही मिळवले आहेत. जी स्पर्धा महाराष्ट्र ओपन नावाने आयोजित केली जाईल.
यासंदर्भात, अंकिता रैना म्हणाली, की भारतीय भूमीवर होणाºया स्पर्धेसाठी मी तयार आहे. आमच्यासाठी ही सर्वात चांगली संधी आहे. दरम्यान, एमएसएलटीएतर्फे २५ हजार डॉलरच्या आणखी तीन स्पर्धा होतील.
एमएसएलटीएचे महासचिव सुंदर अय्यर म्हणाले, की अंकिता रैना, करमन कौर थांडी, ऋतुजा भोसले आणि इतर खेळाडूंचा दर्जा पाहता त्यांना अशा संधी मिळायला हव्यात.
स्पर्धा संचालक प्रशांत सुतार म्हणाले, ‘‘खेळाडूंची आवड बघत आम्ही मुंबईत या स्पर्धा आयोजिण्याचे ठरवले आहे. यापूर्वी डब्ल्यूटीए टुर्नामेंट २०१२ मध्ये पुणे येथे झाली होती. विश्व मानांकित एलिना स्वितोलिनाने जपानच्या किमिको डेट-क्रुमचचा पराभव करीत जिंकली होती. मुंबई ओपनचे मुख्य ड्रॉ आणि क्वालिफायरमध्ये चार वाइल्ड कार्ड देण्यात येतील. आंतरराष्ट्रीयस्तरावरील स्पर्धांचे आयोजन महाराष्ट्रात झाल्यास राज्यातील खेळाडूंना त्याचा नक्कीच फायदा होईल.