संगीत प्रेमींनो, तयार रहा! युट्युबमध्ये येत आहेत दोन नवीन फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 14:57 IST2021-06-02T14:55:28+5:302021-06-02T14:57:12+5:30
YouTube new feature: युट्युबवर आता लूपवर व्हिडीओज बघता येतील तसेच क्लिप्स देखील बनवता.

संगीत प्रेमींनो, तयार रहा! युट्युबमध्ये येत आहेत दोन नवीन फीचर्स
युट्युबचा वापर सध्या मोठ्याप्रमाणावर केला जात आहे. काही लोक यावर माहितीपूर्ण व्हिडीओज बघतात तर काही करमणुकीसाठी युट्युबचा वापर करतात. बऱ्याचदा युट्युबचा वापर गाणी ऐकण्यासाठी देखील केला जातो. पण जर एखादं गाणं जर आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकायचे असेल तर? युट्युबवर पुन्हा पुन्हा एकच व्हिडीओ आपोआप बघता येईल, अशी सोय नाही. पण गुगलच्या मालकीची हि कंपनी यासाठी ‘व्हिडीओ ऑन लूप’ हे फिचर घेऊन येणार आहे. (Video on loop and clip videos features will come to YouTube android app soon)
ड्रॉइडमेज नावाच्या एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, या फिचरची चाचणी अँड्रॉइडवर केली जात आहे. परंतु युट्युबकडून हे फिचर कधी येईल याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
युट्युब दोन नवीन फिचर घेऊन येणार आहे. यातील पहिले फिचर व्हिडीओ लूपमध्ये म्हणजे, एकदा व्हिडीओ संपला कि पुन्हा तोच व्हिडीओ प्ले करण्यास मदत करेल. हा पर्याय युट्युबच्या डेस्कटॉप व्हर्जनवर उपलब्ध होई, परंतु मोबाईल अॅपमध्ये दिसत नाही. लवकरच तीन डॉट्सच्या मेनूमध्ये या फीचरचा समावेश केला जाईल.
‘क्लिप व्हिडीओज’ हे युट्युबच्या अँड्रॉइड अॅपमध्ये येणाऱ्या नवीन फीचरचे नाव आहे. नावाप्रमाणे फीचरच्या मदतीने व्हिडीओजच्या क्लिप बनवता येतील. या क्लिप्सची वेळ मर्यादा 60 सेकंदाची असेल. याचा वापर करून बनवण्यात आलेल्या क्लिप्स शेअर करता येतील. या टूलसाठी कैचीचे चिन्ह व्हिडीओ खाली दिसू लागेल.
काही दिवसांपूर्वी युट्युबने घोषणा केली होती कि 1 जूनपासून काही नियमांमध्ये बदल केले जातील. यानुसार युट्युबवरील वापरकर्त्यांना एखाद्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्यांचा चेहरा असलेले व्हिडीओ अपलोड करता येणार नाहीत. तसेच जरी एखादा क्रिएटर युट्युबच्या पार्टनर प्रोग्रामचा भाग नसला तरी त्याच्या त्याच्या व्हिडीओवर जाहिराती देण्याचा अधिकार कंपनीला असेल.