यंदा ३ कोटी कम्प्युटर्स जमा होणार भंगारात? ऑपरेटिंग सीस्टिमअभावी ठरवले जाणार निरुपयोगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 12:06 IST2025-01-11T12:06:09+5:302025-01-11T12:06:54+5:30
२०२५ मध्ये मोठ्या सुरक्षा अपयशातून वाचायचे असेल, तर सर्व वापरकर्त्यांना विंडोज११ किंवा अन्य पर्यायी ऑपरेटिंग सिस्टमवर स्थलांतरित व्हावे लागेल.

यंदा ३ कोटी कम्प्युटर्स जमा होणार भंगारात? ऑपरेटिंग सीस्टिमअभावी ठरवले जाणार निरुपयोगी
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: १४ ऑक्टोबर २०२५ रोजी विंडोज१० चा सपोर्ट संपविण्याचा निर्णय मायक्रोसॉफ्टने जाहीर केला आहे. त्यामुळे जगभरातील तब्बल ३.२ कोटी संगणक कचऱ्याच्या डब्यात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. या संगणकांना विंडोज११ किंवा अन्य योग्य ऑपरेटिंग सिस्टिम्सवर स्थानांतरण करावे लागेल, अन्यथा ते निरुपयोगी ठरतील.
आयटी सुरक्षा तज्ज्ञ थॉर्स्टन उरबांस्की यांनी सांगितले की, २०२५ मध्ये मोठ्या सुरक्षा अपयशातून वाचायचे असेल, तर सर्व वापरकर्त्यांना विंडोज११ किंवा अन्य पर्यायी ऑपरेटिंग सिस्टमवर स्थलांतरित व्हावे लागेल. ऑक्टोबर २०२५ पर्यंत प्रतीक्षा करणे वापरकर्त्यास सायबर हल्ला आणि डाटा चोरी याबाबत संवेदनशील बनवू शकते. सध्या जर्मनीत सुमारे ६५ टक्के (३२ दशलक्ष) संगणक विंडोज१० चा वापर करतात. केवळ ३३ टक्के (१६.५ दशलक्ष) संगणक विंडोज११ वर आहेत. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी नागरिकांना तसेच विविध कंपन्यांना तातडीने ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेड करावी लागणार आहे.
काय आहे पर्याय?
मायक्रोसॉफ्टकडून विंडोज१० चा सपोर्ट संपणार याचा अर्थ या संगणक प्रणालीला मोफत सुरक्षा अपडेट मिळणार नाही. त्यामुळे या संगणक प्रणालीस सुरक्षा जोखीम, डाटा चोरी आणि मालवेअर हल्ल्यांचा सामना करावा लागू शकतो. वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या वापरकर्त्यांना याचा फटका बसेल. जाणकारांनी सांगितले की, विंडोज१० च्या वापरकर्त्यांसाठी विंडोज११वर अपग्रेड होणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. अन्य ऑपरेटिंग सिस्टिमचा पर्यायही आहे. सुरक्षाविषयक चिंता वाटत असेल, तर लिनुक्ससारख्या सुरक्षित पर्यायांचा विचारही केला जाऊ शकतो.