ChatGPT शब्दाचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या GPT चा फुल फॉर्म...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 15:21 IST2025-10-15T15:21:16+5:302025-10-15T15:21:50+5:30
Ai आता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनलं आहे.

ChatGPT शब्दाचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या GPT चा फुल फॉर्म...
ChatGPT: कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजेच Artificial Intelligence आता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनलं आहे. डेटा अॅनालिटिक्सपासून ते चॅटबॉट्सपर्यंत, आज प्रत्येक ठिकाणी AI चा प्रभाव जाणवतोय. या तंत्रज्ञानाच्या नव्या युगात ChatGPT हे नाव सर्वाधिक लोकप्रिय झालं आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, या नावातील GPT या तीन अक्षरांचा नेमका अर्थ काय आहे?
GPT म्हणजे “Generative Pre-Trained Transformer”, आणि हे तीन शब्दच या तंत्रज्ञानाच्या शक्तीचं मूळ आहेत. चला समजून घेऊया, हे तीन घटक ChatGPT ला इतकं बुद्धिमान आणि मानवीसदृश कसं बनवतात.
G- Generative : निर्माण करण्याची क्षमता
GPT चा पहिला घटक आहे Generative, म्हणजे निर्माण करणारा. जुन्या काळातील AI तंत्रज्ञान केवळ ओळख (जसे फोटोमध्ये वस्तू ओळखणे) किंवा भाकीत (उदा. शेअर बाजारातील कल) इतकंच करू शकत होतं, पण GPT तसं नाही, ते नवीन गोष्टी निर्माण करू शकतं. हे मॉडेल मानवी भाषेचा टोन, शैली आणि ढंग शिकतं आणि त्यावर आधारित नवीन लेख, ईमेल, कविता, कथा किंवा कोड तयार करतं. म्हणूनच ChatGPT ची उत्तरं इतकी नैसर्गिक आणि मानवी भासतात.
P- Pre-Trained : आधीच प्रशिक्षण दिलेला मेंदू
GPT चं दुसरं वैशिष्ट्य आहे Pre-Trained, म्हणजे वापरापूर्वीच त्याला प्रचंड प्रमाणात ज्ञान दिलं जातं. या प्रशिक्षणात मॉडेलला लाखो पुस्तकं, लेख, वेबसाइट्स आणि डेटा शिकवला जातो. त्यामुळे त्याला भाषा, व्याकरण, तथ्य, संस्कृती आणि संदर्भ यांची खोल समज येते. या विस्तृत प्रशिक्षणामुळे GPT ला प्रत्येक नवीन कामासाठी पुन्हा प्रशिक्षित करण्याची गरज नसते. एकच मॉडेल प्रश्नांची उत्तरं देणं, लेख लिहिणं, कोड तयार करणं, संशोधनाचा सारांश देणं असे विविध कामं सहज करू शकतं.
T- Transformer : बदल घडवणारी रचना
GPT चा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे Transformer. 2017 मध्ये Google च्या संशोधकांनी विकसित केलेल्या या आर्किटेक्चरनं AI जग बदललं. यात असलेला Attention Mechanism एकाच वेळी संपूर्ण वाक्य किंवा परिच्छेदावर लक्ष केंद्रित करू शकतो. जुने मॉडेल शब्द एकेक करून वाचत आणि संदर्भ देतात, पण Transformer मॉडेल एकाच वेळी संपूर्ण मजकूर समजून अधिक सुसंगत आणि संदर्भपूर्ण उत्तरं देतो.
GPT का आहे क्रांतिकारी?
GPT मॉडेल्सची खासियत म्हणजे त्यांची मानवी विचार आणि भावनांशी साधर्म्य असलेली अभिव्यक्ती. ते फक्त व्याकरणदृष्ट्या बरोबर उत्तरं देत नाही, तर भावना आणि प्रसंगानुसार योग्य प्रतिसाद देतात. नवीन व्हर्जन GPT-4 अब्जावधी पॅरामीटर्सवर प्रशिक्षित आहेत, ज्यामुळे त्याची अचूकता, संदर्भज्ञान आणि भाषिक समज विलक्षण वाढली आहे.
मल्टिमॉडल AI ची नवी दिशा
GPT आता फक्त भाषेपुरते मर्यादित राहिलेलं नाही. त्याचे नवीन व्हर्जन्स मल्टिमॉडल AI म्हणून विकसित होत आहे, जे केवळ मजकूर नव्हे, तर चित्र, आवाज आणि व्हिडिओ देखील समजू आणि तयार करू शकतात. यामुळेच आज GPT चा वापर शिक्षण, आरोग्य, मनोरंजन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांत झपाट्याने वाढत आहे.