नवी क्रांती! एक ऑर्डर अन् एका सेकंदात लेख, कविता, बातमी लिहून तयार; ChatGPT आहे तरी काय?, All You Need To Know...

By मोरेश्वर येरम | Published: December 7, 2022 10:04 AM2022-12-07T10:04:24+5:302022-12-07T10:41:07+5:30

चॅटबॉटची अनुभूती घेतलेले बरेच जण ChatGPT मध्ये Google Search ची जागा घेण्याची ताकद असल्याची प्रतिक्रिया देत आहेत.

What is ChatGPT All you need to know about the new dialogue based AI chatbot features and limitations | नवी क्रांती! एक ऑर्डर अन् एका सेकंदात लेख, कविता, बातमी लिहून तयार; ChatGPT आहे तरी काय?, All You Need To Know...

नवी क्रांती! एक ऑर्डर अन् एका सेकंदात लेख, कविता, बातमी लिहून तयार; ChatGPT आहे तरी काय?, All You Need To Know...

googlenewsNext
ठळक मुद्देChatGPT हे ओपन एआय (Open AI) या आर्टिफिशल इंटिलिजन्सवर संशोधन करणाऱ्या संस्थेनं विकसित केलेलं एक अ‍ॅप आहे. हा एक चॅटबॉट आहे जो संभाषणात्मक पद्धतीनं तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो.ChatGPT मध्ये गुगल सर्चची जागा घेण्याची क्षमता आहे असा अनेकांचा दावा आहे.

- मोरेश्वर येरम

तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या माध्यमातून एका नव्या क्रांतीच्या उंबरठ्यावर आपण येऊन ठेपलो आहोत. कारण या उंबरठ्यापल्याड पडणारं प्रत्येक पाऊल हे नवं आणि अविश्वसनीय गोष्टी साध्य करुन दाखवणारं असेल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इंटरनेट विश्वात सध्या चर्चेचा विषय ठरत असलेलं ChatGPT हे चॅटबॉट त्यातीलच एक पाऊल आहे. OpenAI कंपनीनं ChatGPT हे AI-बॅक्ड चॅटबॉट विकसीत केलं आहे.

OpenAI च्या अधिकृत वेबसाइटवर सार्वजनिक चाचणीसाठी ते उपलब्ध आहे आणि युझर्स त्याची वैशिष्ट्य अगदी विनामूल्य वापरून पाहू शकतात. आता या चॅटबॉटची अनुभूती घेतलेले बरेच जण ChatGPT मध्ये Google Search ची जागा घेण्याची ताकद असल्याची प्रतिक्रिया देत आहेत. ChatGPT हे तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर किंवा एकादं कार्य काही सेकंदात अगदी विनासायास उपलब्ध करुन देतं. मग ते गणिताचं कोडं असो एखाद्या विषयाची माहिती असो किंवा मग अगदी तुम्हाला हवा असलेला निबंध. ChatGPT एका सेकंदात भरभर तुमचं काम उरकून टाकतं. 

आता इतर तंत्रज्ञानाप्रमाणं ChatGPT ही देखील काही परिपूर्ण व्यवस्था नाही. कारण मानवानं घडवलेली क्रांती मानवापेक्षा श्रेष्ठ असायला हवी अशी अपेक्षा करणं हेच तकलादू आहे. अगदी कंपनीनंही याच्या मर्यादा मान्य केल्या आहेत. पण तंत्रज्ञानाच्या युगात नवी क्रांती घडवणाऱ्या या ChatGPT बद्दल आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आणि तितकंच रोमांचक आहे. 

ChatGPT म्हणजे काय?
सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ChatGPT एक चॅटबॉट आहे जिथं यूझर प्रश्न विचारू शकतात आणि AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) च्या माध्यमातून हे प्लॅटफॉर्म त्या प्रश्नांची उत्तरं देतं. तेही अवघ्या एका सेकंदात. कंपनीनं ते अशा प्रकारे डिझाइन केलं आहे की यूझर्सना तांत्रिक पद्धतीनं पण बिनचूक उत्तरं मिळू शकतील.

ओपन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या कंपनीनं हे तंत्रज्ञान विकसीत केलं आहे. उद्योगपती इलॉन मस्क हे या कंपनीचे सहसंस्थापक आहेत. ChatGPT चे सध्याचे सीईओ सॅम अल्टमन आणि इलॉन मस्क यांनी या कंपनीची स्थापन केली. १ डिसेंबरपासून बिटा टेस्टिंग अर्थात चाचणीसाठी हा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. लाँच झाल्यानंतर अवघ्या आठवडाभरात चॅटजीपीटीने १ मिलिअन युझर्सचा टप्पा गाठला आहे. 

'चॅटजीपीटी'ला मानवाचा एक आभासी सहाय्यक देखील म्हणता येईल. चॅटजीपीटी ट्रान्सफॉर्म आधारित मॉडेलवर काम करून संभाषणात्मक डेटाचा वापर करुन तुमची मदत करतं. हा चॅटबॉट तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना अतिशय अभ्यासपूर्वक उत्तर देतो. तसंच प्रतिप्रश्नाचं देखील उत्तर देतो. याशिवाय मजकुरात काही चुका असतील तर त्याही सांगतो आणि चुकीचे संदर्भ काढून टाकतो.

ChatGPT नेमकं काय करतं?
आपल्याला एखादी माहिती हवी असली की आपण जसं गुगलवर सर्च करतो तसंच तुम्ही या बॉटला प्रश्न विचारू शकता. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तो लगेच एका सेकंदात देतो. तुम्ही एखाद्या विषयावर कविता मागितली तर तीही तो तयार करून देतो. एखादी घडामोड सांगून त्याची बातमी तयार करुन द्यायला सांगितली तर तिही एका सेकंदात तुमच्यासमोर तयार असते. बरं दोन व्यक्तींमधले संवाद तुम्हाला लिहून हवे असतील तर फक्त तशी सूचना या बॉटला करायची तो संबंधित व्यक्तींचे संदर्भ शोधून काही सेकंदात तुमच्यासाठी संवादही लिहून देतो. अगदी तुम्ही एखादं कोडं किंवा गणित सोडवण्याची सूचना केली तर तेही चुटकीसरशी सोडवतो. 

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या धर्तीवर हे चॅटबॉट विकसीत केलं गेलं असल्यानं ते तुम्ही सांगितलेली कृती तुमच्या डोळ्यांदेखत करतं आणि धडाधडा मजकूर लिहू लागतं. त्यामुळे या तंत्रज्ञानानं अवघ्या काही दिवसांत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

ChatGPT चा भविष्यातील वापर कसा असेल?
एकदा चाचण्या पूर्ण झाल्या की OpenAI कंपनी चॅटबॉट्सवर अवलंबून असलेल्या कंपन्यांना ChatGPT च्या तंत्रज्ञानाचा विस्तार करुन देऊ शकते. उदाहरणार्थ, चॅटबॉटचा वापर ग्राहक सेवेसाठी (एअरटेल, पेटीएम, स्विगी आणि बरेच काही), वैयक्तिक सहाय्यक (यूझर्सना शेड्युलिंग, रिमाइंटर आणि इतर दैनंदिन कामांमध्ये मदत करण्यासाठी) आणि विद्यार्थ्यांसाठी (गुंतागुंतीच्या प्रश्नांचं, गणितांचं निराकरण करण्यात मदत करण्यासाठी) होऊ शकतो. तसंच एखाद्या विषयावर निबंध, बातमी आणि लेख लिहून देण्याचीही सोय यात आहे.  

आम्ही याची एक चाचणी केली, Google आणि ChatGPT ला विचारलं की भविष्यात भारत सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल का? Google सर्चनं ऑनलाइन शोधकार्य  राबवत या विषयाशी निगडीत लेटेस्ट बातम्यांच्या लिंक्स उपलब्ध करुन दिल्या. दुसरीकडे, ChatGPT ने अगदी समर्पक आणि चुटकीसरशी उत्तर दिलं. अर्थात जे उत्तर मिळालं त्याच्याशी प्रत्येक जण सहमत होईल असंही नाही.

गुगलनं दिलेलं उत्तर...

ChatGPT  चॅटबॉटनं दिलेलं उत्तर...

ChatGPT हे Google ची जागा घेऊ शकतं का?
जे काम गुगल सर्चच्या सहाय्यानं यूझर करत होता ते आणखी सहजरित्या चॅटजीपीटी करत असल्याचं यूझर्सचं म्हणणं असलं तर सध्या तरी गुगलची जागा चॅटजीपीटी घेऊ शकत नाही. कारण Google हे एक सर्च इंजिन आहे आणि ChatGPT हे चॅटबॉट आहे. पण दोन्ही प्लॅटफॉर्मचा मूळ उद्देश एकच आहे तो म्हणजे यूझर्सनं विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरं देण्यास मदत करणं. ChatGPT एक चॅटबॉट आहे जो यूझर्सशी संभाषणात्मक पद्धतीनं उत्तरं देतो. दुसरीकडे, Google इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी डिझाइन केलेलं सर्च इंजिन आहे.

ChatGPT च्या मर्यादा काय आहेत?
OpenAI कंपनीनं हेही म्हटलं आहे की ChatGPT अधूनमधून चुकीची माहिती निर्माण करू शकतं. कारण चॅटबॉटमध्ये साठवलेलं ज्ञान २०२१ च्या पूर्वीच्या जागतिक घडामोडींपुरतं मर्यादित आहे. ते "कधीकधी हानिकारक सूचना किंवा पक्षपाती माहिती देऊ शकतं"

ट्विटरवर या चॅटबॉटच्या क्षमतेचं कौतुक करणारी अनेक ट्विट्स आहेत. त्याचप्रमाणे अनेकांनी त्याच्या मर्यादाही लक्षात आणून दिल्या आहेत. उदाहरणार्थ, जेव्हा आम्ही विशिष्ट देशाशी किंवा प्रोडक्टशी निगडीत काही प्रश्न विचारले, तेव्हा चॅटबॉटला उत्तर देण्यासाठी संघर्ष करावा लागला.

आम्ही विचारलं की iPad Pro 2022 ला Airtel 5G सपोर्ट आहे का? आणि ChatGPT चे उत्तर असे, "मी इंटरनेट ब्राउझ करू शकत नाही आणि त्यामुळे iPad Pro 2020 Airtel eSIM ला सपोर्ट करतो की नाही याबद्दल माहिती देऊ शकत नाही. माझा प्रशिक्षण डेटा फक्त २०२१ सालापर्यंत मर्यादित आहे, त्यामुळे जरी मी इंटरनेट ब्राउझ करू शकलो तरी माझ्याकडे या विषयावरील सर्वात अद्ययावत माहिती नाही"

'चॅटजीपीटी'मध्ये काही कच्चे दुवे दिसून येत असले तरी आगामी काळात त्यावरही तोडगा काढला जाऊ शकेल यात शंका नाही. तसंच तंत्रज्ञानानं जीवन जितकं सुकर होईल यात तथ्य असलं तरी त्यातून निर्माण होणारे धोके देखील तितकेच गंभीर असू शकतात हेही अमान्य करता येणार नाही. खरंतर आगामी काळात या धोक्यांना मानुष्यप्राणी कसा प्रतिसाद देईल यावरच पुढची दिशा ठरणार आहे.

Web Title: What is ChatGPT All you need to know about the new dialogue based AI chatbot features and limitations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :googleगुगल