धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 07:52 IST2026-04-07T07:51:01+5:302026-04-07T07:52:07+5:30
३.६ ते १६.४ अंश फॅरेनहाइटने वाढले तापमान

धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: ज्या भागात ‘एआय डेटा सेंटर्स’ उभारले जात आहेत, तिथे तापमानात कमालीची वाढ होते आहे, असा निष्कर्ष केंब्रिज विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या एका ताज्या संशोधनातून समोर आला आहे. या तापमानातील वाढीमुळे जगभरातील सुमारे ३४ कोटींहून अधिक लोकांना उष्णतेच्या तीव्र झळा सोसाव्या लागू शकतात, असा इशारा या अभ्यासात देण्यात आला आहे. मेक्सिको व स्पेन यांसारख्या देशांमध्येही डेटा सेंटर्सच्या वाढत्या संख्येमुळे तेथील तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
समस्या गंभीर होणार
तज्ज्ञांच्या मते, येणाऱ्या काळात एआय डेटा सेंटर्सची संख्या आणखी वेगाने वाढणार आहे, ज्यामुळे ही समस्या अधिक भयावह रूप धारण करू शकते. यामुळे पर्यावरण, मानवी आरोग्यावर याचे दूरगामी परिणाम होणार आहेत.
२० वर्षांचा अभ्यास
- केंब्रिज विद्यापीठाने गेल्या २० वर्षांतील हवामानातील बदलांच्या आकडेवारीचे सखोल विश्लेषण केले आहे. या संशोधनासाठी जगभरातील ६,००० हून अधिक डेटा सेंटर्सच्या आसपासच्या क्षेत्रांचा समावेश करण्यात आला होता.
- ग्लोबल वॉर्मिंगसारखे घटक बाजूला ठेवून केवळ डेटा सेंटर्सच्या परिणामांचा अभ्यास केला असता, तापमानात स्पष्ट वाढ झाल्याचे शास्त्रज्ञांना दिसून आले आहे.
- मेक्सिको व स्पेन यांसारख्या देशांमध्येही याच प्रकारचा पॅटर्न पाहायला मिळाला असून, तिथे डेटा सेंटर्सच्या संख्येत वाढ होताच तापमानाचे आकडेही वाढले.
३.६ ते १६.४ अंश फॅरेनहाइटने वाढले तापमान
संशोधनात असे आढळले आहे की, एखादे डेटा सेंटर सुरू झाल्यानंतर त्याच्या आसपासच्या १० किलोमीटरच्या परिघात सरासरी ३.६ अंश फॅरेनहाइटने तापमान वाढते. ही विशिष्ट प्रकरणांमध्ये तर ही वाढ १६.४ अंश फॅरेनहाइटपर्यंत नोंदविण्यात आली आहे. डेटा प्रोसेसिंग आणि सर्व्हर्सना थंड ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘कुलिंग सिस्टीम’मधून बाहेर पडणारी उष्णता हे या तापमानवाढीचे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे.